'महाराष्ट्राला 'अत्याधुनिक राज्य' बनवायचे आहे' - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'महाराष्ट्राला 'अत्याधुनिक राज्य' बनवायचे आहे' - मुख्यमंत्री

Share This


मुंबई - देशात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य असून, भविष्यात "अत्याधुनिक राज्य‘ बनवण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी पंधरा वर्षांच्या सत्तेनंतरही राज्याची जनता चौथ्यांदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच कौल देईल, असे आश्‍वासक बोल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काढले. आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर वर्षा या सरकारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा प्रारंभच केला. राज्यात मागील पंधरा वर्षांत अनेक संकटे आली. मात्र आघाडी सरकारने त्यावर मात करून महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कायम ठेवल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर कॉंग्रेसने मजबूत पक्षबांधणी केली आहे; तर आघाडी सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. सलग तीन विधानसभा निवडणुकांत जनतेने आघाडीच्या विकासकामांनाच पसंती दिल्याचा दाखला देत, या वेळीही महाराष्ट्राची जनता आघाडीलाच सत्ता देईल, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात अनेक पायाभूत प्रकल्प, जलसंधारणाची कामे, सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाल्याने जनतेला त्यांचा थेट लाभ होत आहे. आगामी काळात महाराष्ट्रात बौद्धिक कौशल्यावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न राहील, असा अजेंडाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. 

विधानसभा निवडणुकीत स्वत: उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. याबाबतचा अंतिम निर्णय कॉंग्रेसचे केंद्रीय निवड मंडळ घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत दक्षिण कऱ्हाडमधून पृथ्वीराज चव्हाण उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील, असे संकेत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages