मुंबई / प्रतिनिधी
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित आणि जातीयवादी पक्षांना शह देण्यासाठी देश बचावो, पार्टी लोकशासन पक्ष, सत्यशोधक ओ. बी. सी. परिषद, रिपब्लिकन सेना, अखिल भारतीय सम्राट सेना अशा पुरोगामी चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या पक्ष-संघटनांनी एकत्र येवून संविधान बचाव मोर्चाची स्थापना करून आघाडी आणि महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनसंपर्क अभियान मेळावा आणि विधानसभा निवडणूक प्रचार शुभारंभाचे भव्य आयोजन ता. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता, बालगंधर्व पुणे याठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमास माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आय.पी. एस. अधिकारी सुरेश घोपडे, मुख्य निमंत्रक हनुमंत उपरे, ब्रि. सुधीर सावंत, आनंदराव आंबेडकर आदि मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असणाऱ्या आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा प्रचंड आलेख निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये नुकत्याच खोट्या आश्वासनाच्या रंजक स्वप्नाद्वारे सर्वसामान्यांची थट्टा करणाऱ्या जातीयवादी पक्षांना महाराष्ट्राच्या पुरोगामी वारसा कायम टिकवा यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी वारसा जोपासणाऱ्या आणि शिव - फुले -शाहु - आंबेडकरांचा विचार कृती मध्ये उतरविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पक्ष - संघटनांना आम्ही एकत्र करून संविधान बचावो मोर्चाची स्थापना केली आहे. केंद्रामध्ये आलेले जातीयवाद्यांचे सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलून मनुस्मृतीची संहिता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून सतेच्या माध्यमातून आघाडी शासन विविध योजनांच्या नावाखाली भ्रष्टाचार करून सर्वसामन्यांची दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. या निगरगट्ट राजकारण्यांच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संविधान बचावो मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.असे संविधान बचावो मोर्चाचे मुख्य संयोजक आणि देश बचावो पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.