अमित शहांची डायरी तपासा म्हणजे कळेल!: पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2014

अमित शहांची डायरी तपासा म्हणजे कळेल!: पवार


महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भलामोठा भ्रष्टाचार केला, असा कंठशोष एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने केला खरा. पण, त्या नेत्याची डायरी तपासली, तर त्यात त्या नेत्यावर कुठल्या कोर्टात किती तारखेला कुठल्या खटल्याची सुनावणी आहे, याचीच माहिती मिळेल. त्यामुळे त्यांना स्कॅम, स्कॅम असे ओरडण्याचा काय अधिकार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शनिवारी घणाघाती टीका केली. 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबतच्या आघाडीतील जागावाटपाचे घोडे अडलेले असताना, शनिवारी मुंबईत राष्ट्रवादीने दणक्यात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी पवार यांनी, 'ज्यांच्यावर कोर्टात आरोप आहेत, अशांनी समाजात बोलताना मर्यादा ठेवली पाहिजे. मात्र, मर्यादा पाळतील, तर ते भाजपवाले कसले?', असा टोमणा अमित शहा यांचे नाव न घेता दिला.

'केरळचे राज्यपाल म्हणून सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश सतशीवम यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपतींना शपथ देणारेच राष्ट्रपतींकडून ऑर्डर घ्यायला लागले, ही त्या पदाची प्रतिष्ठा आहे? हे पद कसे स्वीकारले, असे वार्ताहरांनी विचारताच राज्यपाल पद घेतले नसते; तर शेती करावी लागली असती, असे उत्तर त्या महाशयांनी दिले. शेती करणे हे काय कमीपणाचे लक्षण आहे का,' असा सवाल पवार यांनी यावर उपस्थित केला. भाजप अध्यक्षांच्या बाजूने निकाल दिल्याची ही परतफेड झाली असल्याच्या आरोपाच्या बातम्या आपल्या वाचनात आल्याचे पवार यावर म्हणाले.

सुखाने नांदा

युपीए व राज्यातील सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आणि विविध घटकातील लोकांसाठी राबविलेल्या योजनांचा हवाला देत, शेजारच्या राज्यापेक्षा महाराष्ट्राची प्रगती अधिक असल्याचे पवार म्हणाले. समाजात ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांना सत्तेत रास्त वाटा देण्याची भूमिका राष्ट्रवादीनेच घेतली. राज्यातील सूज्ञ जनता निवडणुकीत रास्त कौल देईल. राष्ट्रवादी सोडलेल्यांचा उल्लेखही भाषणात करू नका. ही मंडळी गेल्यामुळे आपण सुखी झालो. त्यांनी तेथे सुखाने नांदावे असे पवार म्हणाले.

Post Bottom Ad