मुंबई / रशिद इनामदार
आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि लागोपाठ येणाऱ्या सणांच्या काळात चोख बंदोबस्तासाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी काढले आहेत. याकाळात पोलिस अधिकाऱ्यांना वैद्यकीय सुट्टी शिवाय कोणतीही सुट्टी घेता येणार नाही असेही या आदेशात म्हटले आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पोलिसांना साप्ताहिक सुट्टी मिळणार नाहीत.
येत्या २५ सप्टेंबर पासून ७ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रौ उत्सव, दसरा, बकरा ईद कोजागिरी पोर्णिमा हे सण लागोपाठ येत असल्यामुळे या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात येणाऱ्या सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात वैद्यकीय रजा वगळून साप्ताहिक सुट्ट्या व इतर सर्व रजा बंद करण्यात आल्या असल्याचे या आदेशात म्हटलं आहे. सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक , पोलिस आयुक्त, परिक्षेत्रीय सर्व विशेष पोलिस महानिरीक्षक तसेच लोहमार्ग पोलिस अधीक्षक व आयुक्तांना हा आदेश फ्याक्स द्वारे पाठवण्यात आला आहे.