काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने राज्यात ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. शेतकऱ्यांच्या विधवांसाठीचे पैसेही त्यांनी खाल्ले, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
एकेकाळी महाराष्ट्र उद्योग, शिक्षण, सहकार आदी क्षेत्रांत एकेकाळी देशात अग्रेसर होता. मात्र, १५ वर्षांत तो पूर्णपणे पिछाडीवर गेला आहे, असा दावाही त्यांनी केला. राज्यात १५ वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात दुष्काळासह अनेक अस्मानी संकटे आली. राजाची नियत चांगली असली, तर देवही मदत करतो. पण, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियत चांगली नसल्यानेच अशी संकटे कोसळत आहेत. यातून मुक्त होण्यासाठी काँगेसला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यूपीए सरकारने जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाखाली शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा करार केला, तेव्हा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मूग गिळून गप्प का बसले, असा प्रश्न करत त्यांनी पवारांनाही लक्ष्य केले.
या बैठकीनंतर शहा यांनी खासदार पूनम महाजन यांच्या घरी भोजन घेतले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल त्यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही शहा यांनी केले.
पाचपुते, सूर्यकांता पाटील भाजपमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगांवकर, माजी खासदार सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माधव किन्हाळकर यांनी गुरुवारी शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे दरवाजे सगळयांसाठी खुले आहेत. भाजपचा विचार मानणाऱ्यांना पक्षात सामावून घेतले जाईल, असे शहा यावेळी म्हणाले.