भाजपचे दबावतंत्र यशस्वी - शिवसेनेला पकडले कात्रीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपचे दबावतंत्र यशस्वी - शिवसेनेला पकडले कात्रीत

Share This
विधानसभेच्या जागावाटपांचा तिढा कायम असताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या 'मातोश्री'भेटीच्या निमित्ताने अत्यंत सुनियोजित पद्धतीने शिवसेनेवरील दबाव वाढविण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याच्या कार्यक्रमाचा उल्लेख न करणे हा सेनेला फारसे महत्त्व न देण्याच्या भाजपच्या रणनीतीचाच भाग होता. मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांच्याकडून भेटीचे निमंत्रण आल्यानंतर अमित शहा यांनी त्यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेचा जमेल तेथे पाणउतारा करण्याची रणनीती भाजपच्या धुरिणांनी आखली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेले यश हे मोदी लाटेमुळे मिळाल्याचे भाजप नेते ठासून सांगत आहेत. मोदी लाटेमुळेच कोषात गेलेल्या शिवसेनेला उर्जितावस्था प्राप्त झाल्याचे भाजप नेते व कार्यकर्ते उघड बोलत आहेत. शिवसेना ऐन भरात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी हे स्वतःहून मातोश्रीवर जात असत. एनडीएचा घटक पक्ष असूनही बाळासाहेबांच्या काळात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला होता, या जिव्हारी लागलेल्या घटनांचा वचपा आता भाजप काढत आहे.

अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर गुरुवारी प्रथमच मुंबईत आले. या दौऱ्यातील त्यांच्या कार्यक्रमात 'मातोश्री'वर उद्धव यांची भेट घेण्याचा उल्लेख नव्हता. शिवसेनेकडूनही शहाणा हो, असा मथळा असलेला भाजपवर दबाव टाकणारा प्रचार सोशल मीडियावर करण्यात येत होता. सेनेकडूनही कोणतेही अमित शहा यांना आमंत्रण देऊ नये, अशी ​शिवसैनिकांची इच्छा होती. हा साहेबांचा महाराष्ट्र आहे, या शिवसेनेच्या प्रचाराला भाजपकडून हा वीर सावरकर, गोळवलकर गुरुजी व डॉ. हेडगेवारांचाही महाराष्ट्र आहे, असे जशास तसे उत्तरही दिले गेले. तरीही गुरुवारी सकाळपर्यंत सेनेकडून भाजपच्या दबावतंत्राला किंमत दिली गेली नव्हती. मात्र नंतर शिवसेनच्या नेतृत्वाने कच खाल्ली. भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधण्यात येत होता. निमंत्रण द्या, अमित शहा भेटीला येतील, असे भाजपकडून सांगण्यात आले. शेवटी उद्धव यांनी अमित शहा यांना निमंत्रण दिले. त्यानंतरच अमित शहा यांच्या 'मातोश्री'भेटीचे नक्की झाले. अमित शहा 'मातोश्री'वर आल्याने उद्धव यांनी बाळासाहेबांची परंपरा राखली, असे वरवर आता शिवसेना सांगू शकेल. मात्र या भेटीसाठी शिवसेनेला काढाव्या लागलेल्या नाकदुऱ्यांमुळे जागावाटपातही भाजपचाच वरचष्मा राहणार असल्याचेच संकेत यातून मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages