मॉलमध्ये मिळणार रेल्वेचे तिकीट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मॉलमध्ये मिळणार रेल्वेचे तिकीट

Share This
राज्यभरात सध्या मॉल संस्कृती उदयाला आली आहे. सुट्टीच्या दिवशी एखाद्या पर्यटनास्थळाला भेट देण्याऐवजी बहुतांशी जणांची पावले मॉलमध्ये वळायला लागली आहेत. कपड्यांपासून दैनंदिन भाजी खरेदीपर्यंत सर्वच गोष्टी मॉलमध्ये मिळत असल्याने सहकुटुंब सहपरिवार आता मॉलमध्ये जाणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन तिकिटांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने मॉलमध्ये आरक्षित तिकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे. 

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) मॉलमध्ये रेल्वेची आरक्षित तिकिटे विक्री जाणार आहे. मात्र यात एका आरक्षित तिकिटामागे ३0 ते ४0 रुपये सेवा शुल्कही द्यावे लागणार आहे. सणासुदीच्या दिवसात गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी रेल्वे प्रवाशांना अनेक दिव्य पार करावे लागते. ऑनलाईन तिकिटांचा देखील वाढता काळाबाजार पाहता रेल्वे विभागाने यावर उतारा शोधण्यासाठी अभिनव कल्पना आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता मॉल्स, सुपरमार्केट्स आणि शॉपिंग संकुले येथे रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण उपलब्ध करण्याचा विचार रेल्वे करत आहे. 

या योजनेद्वारे मॉल्समध्ये एक वेगळी खिडकी देण्यात येईल. ही खिडकी सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री १0 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. तर रविवारी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडी असणार आहे. या खिडकीवर सामान्य तिकिटे सकाळी ९ वाजल्यापासून आरक्षित होण्यास सुरुवात होईल, तर तात्काळ तिकिटांचे आरक्षण सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे. या खिडक्यांवरून तिकिटे आरक्षित करायची असल्यास सामान्य शयनयान श्रेणीच्या तिकिटासाठी ३0 रुपये आणि वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटासाठी ४0 रुपये सेवा शुल्क आकारले जाणार आहे. या योजनेद्वारे मॉलमध्ये तिकीट खिडकी घेणार्‍याला वर्षभराचे १.६0 लाख रुपये शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. त्याशिवाय तिकिटांच्या रकमेइतकी अनामत रक्कमही जमा करावी लागणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages