तोंडावर विकास आणि प्रत्यक्षात विनाश हे "मोदी मॉडेल‘ - वृंदा करात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तोंडावर विकास आणि प्रत्यक्षात विनाश हे "मोदी मॉडेल‘ - वृंदा करात

Share This
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसांत काय कामगिरी केली, याचे उत्तर नागरिकांना मिळणे आवश्‍यक आहे. तोंडावर विकास आणि प्रत्यक्षात विनाश हे "मोदी मॉडेल‘ आहे. हे मॉडेल धोकादायक आहे, अशी टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी पक्षाचे राज्य सचिव डॉ. अशोक ढवळे उपस्थित होते.  
मोदींचे गुजरात मॉडेल खोटेपणावर आधारित आहे. हे मॉडेल महाराष्ट्रात चालणार नाही. गुजरात हा कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वर्ग नसून केवळ अदानी व अंबानींसारख्या उद्योगपतींसाठी स्वर्ग आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यातील निवडणुकांमध्ये केवळ सत्ता व मुख्यमंत्रिपदासाठी भांडणे सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर व धोरणांवर सर्व पक्षांनी मौन बाळगले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या "लक्ष्मीदर्शना‘च्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली. मुद्रांक गैरव्यवहारातील तेलगीसोबत आरोपी असलेल्या अनिल गोटेच्या प्रचाराला पंतप्रधान येतात, ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

राज्यात माकपचे 20 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील प्रस्थापित पक्षांना माकप पर्याय ठरेल, असा विश्‍वास करात यांनी व्यक्त केला. निवडणुकांत कॉर्पोरेट कंपन्या व कॉर्पोरेट मीडियाचा प्रभाव वाढत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळूनही महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याबाबत पुढाकार घेत नसल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages