‘मोदी लाट’ मित्रपक्षांचा पराभव रोखू शकली नाही! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2014

‘मोदी लाट’ मित्रपक्षांचा पराभव रोखू शकली नाही!

आठवले, जानकर, मेटे, शेट्टी यांचा निक्काल लागला 
मुंबई - भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांचा पराभव मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही.एकीकडे निवडणुकीचे निकाल लागत असताना या पक्षांचे रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे यांचा निक्काल लागला आहे. 

विधानसभा निवडणुकीत झालेली ससेहोलपट आणि वाताहातीनंतर खासदार राजू शेट्टी, खासदार रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे या नेत्यांवर पुढील पाच वर्षें हात चोळत बसण्याची वेळ आता आली आहे. 
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपच्या साथीने पश्‍चिम महाराष्ट्रात १३ जागा लढवल्या, मात्र शेट्टी यांचा एकसुद्धा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. तर खासदार रामदास आठवले यांच्या रिपाइंला खर्‍या अर्थाने पिंपरी, विक्रोळी, चेंबूर या तीन जागा भाजपकडून मिळाल्या होत्या. त्या जागांवरील चंद्रकांता सोनकांबळे, विवेक पंडीत, दीपक निकाळजे हे रिपब्लिकन उमेदवार पराभूत झाले आहेत.

धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपच्या साथीने दौंड, अहमदपूर, श्रीगोंदा, माण, भूम-परांडा या पाच जागा लढवल्या. त्यातील दौंड येथील ‘रासप’चे उमेदवार राहुल कुल हे विजयी झाले आहेत, पण त्यांच्या विजयाचे श्रेय भाजप-रासपा यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबाला असलेल्या राजकीय पार्श्‍वभूमीला दिले जात आहे. राहुल कुल यांची आई आणि वडीलही माजी आमदार आहेत. उरलेल्या चार जागांवर रासपाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीआधीच मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून ‘महायुती’ची कास धरली होती. विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत जाऊन त्यांनी बीडमधून निवडणूक लढवली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे घेतलेली सभाही मेटे यांचा पराभव रोखू शकली नाही. त्यांना राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी धूळ चारली आहे. तसेच शिवसंग्रामच्या त्यांच्यासहित पाचही उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाचे कटू घोट रिचवावे लागले आहेत. 

Post Bottom Ad