गुजराती मतांसाठी भाजपची विशेष योजना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गुजराती मतांसाठी भाजपची विशेष योजना

Share This
मुंबई - शिवसेनेबरोबरची गेल्या 25 वर्षांची युती तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मुंबई आणि ठाणे पट्ट्यातील अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी तेथील गुजराती मतांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आणि पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजराती मतदार निर्णायक असलेल्या मतदारसंघांसाठी विशेष रणनीती आखली आहे. 


मुंबईत 36 पैकी निम्म्यांहून अधिक मतदारसंघांत गुजराती मते निर्णायक ठरतात. कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव, मालाड, दिंडोशी, चारकोप, कांदिवली, बोरिवली, दहिसर तसेच सायन, मुलुंड आदी भागांत गुजराती मतांची संख्या मोठी असून, ती भाजपलाच मिळावीत आणि अन्य पक्षांकडे जाऊ नयेत, यासाठी त्यासाठी त्या त्या भागांत मेळावे, बैठका आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुजराती भाषकांच्या संस्थांशी आधीपासूनच संपर्क साधण्यात आला असून, त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या आहेत.
मराठी मतांचे या वेळी नक्‍कीच विभाजन होईल; पण गुजराती मते फुटणार नाहीत, असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजराती समाजात आपण त्यांच्यामागे उभे राहायला हवे, अशी भावना तयार झाली आहे. त्यामुळे गुजराती मतांवर लक्ष केंद्रित केले तरी आम्हाला मुंबईत घवघवीत यश मिळेल, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत. या खात्रीमुळेच भाजपने बोरिवलीसारख्या गुजराती लोकसंख्या अधिक असलेल्या भागातून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी असलेला गुजराती आणि मारवाडी समाज यांच्यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. गुजरातमधील काही मंत्र्यांकडे अशी जबाबदारी देण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages