जाधव हत्याकांडाची CID चौकशी करावी - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जाधव हत्याकांडाची CID चौकशी करावी - रामदास आठवले

Share This
'पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे झालेल्या जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाची चौकशी सीआयडीमार्फत करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. पुरोगामी विचाराच्या नगर जिल्ह्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जाहीर करावा,' अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी केली.

जवखेडे खालसा येथे जाधव कुटुंबीयांची हत्या झालेल्या स्थळाची आठवले यांनी पाहणी केली, तसेच जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर नगरमध्ये पत्रकार परिषदत घेतली. 'जाधव कुटुंबीयांची हत्या झाली त्या परिसरात वस्त्या आहेत. जाधव कुटुंबीयांची तिघांची हत्या होईपर्यंत आवाज झाला असेल, तो कोणी ऐकलाही नाही?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना जातीयवादातून घडलेली आहे. नगर जिल्हा सहकार व देवस्थानांमुळे प्रसिद्ध असला, तरी जातीय अत्याचाराच्या घटनाही वाढत आहेत. सोनई, खर्ड्यानंतर, येथील घटना तिसरी आहे. त्यामुळे हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणूज जाहीर झाला पाहिजे,' असे आठ‍वले म्हणाले. राज्यपालांना भेटून या कुटुंबीयांच्या नातेवाइकांना दहा लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'सोनई हत्याकांडाला दीड वर्षे होऊनही अद्याप आरोपींना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे जवखेडे येथील घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविला पाहिजे. दोन जिल्हे मिळून एक फास्टट्रॅक कोर्टही मंजूर झाले पाहिजे. सध्याचा अॅट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याची भीती राहिलेली नाही. आता लगेच जामीन मंजूर होतो. हा कायदा प्रभावी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे,' असेही आठवले म्हणाले. दरम्यान, जाधव हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपाइं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार आहे. रिपाइंचे कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुनील साळवे, हनुमंत साठे, विजय वाकचौरे आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

'नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सरकारचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सारखा नक्की नसेल. या गृहमंत्र्यांकडून राज्यातील दलित जनतेचे संरक्षण होईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहील,' असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला. त्यामुळे या घटनेचा चांगल्या पद्धतीने तपास होऊन पीडितांच्या वारसांना मदतीही मिळेल, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages