वांद्रे तलावाचे लवकरच सुशोभिकरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वांद्रे तलावाचे लवकरच सुशोभिकरण

Share This
Bandra_talao1
वांद्रे तलावाच्या सुशोभिकरण कामास त्वरित प्रारंभ करणे आवश्यक असून त्याकरिता असलेल्या तांत्रिक अडचणी येत्या आठवडाभरात दूर करण्यात याव्यात तसेच डिसेंबर 2014 च्या पहिल्या आठवडय़ात या तलावाच्या सुशोभिकरण करण्याचे काम सुरु करावे असे निर्देश स्थायी समितीचे यशोधर फणसे यांनी दिले आहेत.

वांद्रे (प.) येथील वांद्रे तलावाचे बृहन्मुंबई महानगरपालिका सुशोभिकरण करणार असून त्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या दालनात शुक्रवारी दुपारी बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एच/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय कांबळे, महापालिका उपवास्तुशास्त्रज्ञ (पुरातन वास्तुजतन विभाग) नगरकर आणि उद्यान कक्षाचे कार्यकारी अभियंता निगोट व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 


उद्यान खात्याच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या कामाचा आराखडा तयार असून तसेच कार्यादेशही देण्यात आले आहेत. तथापि, सदर कामाबाबत पुरातन वास्तू जतन समितीने उपस्थित केलेल्या काही किरकोळ मुद्यांचे निराकरण करावयाचे असून येत्या आठवडय़ात समितीसमोर त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामातील उर्वरित अडचणींचे निराकरण होऊन कामाला प्रारंभ करणे शक्य होईल.

महापालिका उपवास्तुशास्त्रज्ञ (पुरातन वास्तुजतन विभाग) नगरकर यांनी सांगितले की, या तलावाचे सुशोभिकरण करताना पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावयाची असून त्यामुळे आराखडा सुधारित करण्यात आला आहे. पुरातन वस्तू जतन समितीच्या मुद्यांचे समाधान होऊन समितीने ना हरकत प्रमाणपत्र लवकरात लवकर प्रदान करावे, याकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थायी समिती अध्यक्षांनी अखेरीस नमूद केले की, वांद्रे तलाव हा फक्त वांद्रे परिसराचा नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगरासाठी महत्त्वाचा असल्याने सुशोभिकरणाचे काम प्रलंबित न ठेवता तात्काळ प्रारंभ करून ते प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे. तांत्रिक अडचणींची पूर्तता करून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात या कामाचे भूमिपूजन करण्यात यावे, असे निर्देश फणसे यांनी यावेळी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages