2035 पर्यंत जगभरात 58 कोटी 20 लाख मधुमेही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

2035 पर्यंत जगभरात 58 कोटी 20 लाख मधुमेही

Share This
मुंबई - मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दक्षिण पूर्व आशियात आठ कोटी 70 लाख लोकांना मधुमेह झाला आहे. 2035 पर्यंत संपूर्ण जगात 58 कोटी 20 लाख लोकांना मधुमेह होऊ शकतो, असा अंदाज जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केला आहे. 

बदलत्या जीवनशैलीमुळे होणारा मधुमेह सध्या जगाला पोखरत आहे. सरकारने असंसर्गजन्य आजारांबाबत जागृती करण्याची पद्धत बदलण्याची आवश्‍यकता आहे, असे दक्षिण पूर्ण आशियातील डब्ल्यूएचओच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले. मधुमेहामुळे हृदयविकार व किडनीच्या विकारांबरोबरच संसर्गजन्य आजारांचेही प्रमाण वाढत आहे. क्षय, हिवताप, एड्‌ससारख्या आजारांमुळे अल्पवयातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत मधुमेह झालेले सुमारे 80 टक्के लोक राहतात. या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. भारतात 6 कोटी 50 लाख लोकांना मधुमेह झाला आहे.

सरकारने जनजागृतीबरोबरच इतर सुविधांवरही भर देण्याची आवश्‍यकता असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. सायकल चालवणे, चालणे आणि खेळण्यासाठी मोकळ्या मैदानांची आवश्‍यकता आहे. त्या जागा सरकारने दिल्या पाहिजेत. नागरिकांना साधी राहणी आणि संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. सरकारने संतुलित आहार कमी दरात दिला पाहिजे, असे डॉ. सिंग म्हणाल्या. बालकांची मधुमेह चाचणी करणे आणि मधुमेहाचे व्यवस्थापन याबाबत लोकांना माहिती पुरवण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

फळे, पालेभाज्या खाव्यात 
सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून मधुमेहाला दूर ठेवावे. त्यासाठी आहारात साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थ कमी खावेत. दररोज किमान पाच फळे आणि पालेभाज्या खाव्यात, असा सल्ला डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी दिला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages