मुंबईत आज "हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चा' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत आज "हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चा'

Share This
मुंबई - दिल्लीत झालेल्या "निर्भया‘वरील बलात्काराने देश हळहळला. मेणबत्त्या घेऊन लाखो नागरिक त्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर आले; मात्र जवखेडामधील क्रूर हत्याकांडानंतर ही संवेदना कुठे गेली, असा सवाल खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ही संवेदना जागवण्यासाठी उद्या (ता. 15) शिवाजी पार्क ते राजा बढे चौक या दरम्यान "हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चा‘ काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 


राष्ट्रीय एकता मंच संघटनेच्या वतीने मोर्चा काढला जाईल. मोर्चा शिवसेना भवन, प्लाझा सिनेमा, रानडे रोड, चैत्यभूमी, शिवाजी पार्क ते बालमोहन शाळा चौक या मार्गाने निघेल. मोर्चात माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, चंद्रकांत कुलकर्णी, नागनाथ मंजुळे, भरत जाधव, सोनाली कुलकर्णी, मधू मोहिते, शैला सातपुते आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती खासदार दलवाई यांनी दिली.
निर्भयावरील बलात्कारानंतर सर्व समाजाच्या सर्व थरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली; परंतु फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात दलित आणि मुस्लिमांचे अमानुष खूनसत्र सुरू आहे. हे समाज आक्रंदन करीत आहेत. त्यांच्यासाठी संवेदना जाग्या व्हाव्यात, या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात येत आहे. त्यात सर्व थरातील नागरिक सहभागी होतील, असेही खासदार दलवाई यांनी सांगितले. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages