खिडक्यांसाठीचे नियम बदलण्यासाठी बेस्टची केंद्र सरकारला विनंती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2014

खिडक्यांसाठीचे नियम बदलण्यासाठी बेस्टची केंद्र सरकारला विनंती

मुंबई  (प्रतिनिधी) - बेस्टच्या ताफ्यात येणार्‍या नवीन गाड्यांना जुन्या बसगाड्यांप्रमाणे वरखाली उघडता येणार्‍या मोकळ्या खिडक्या मिळू शकणार आहेत. बसगाड्यांच्या खिडक्यांचे नियम बदलण्यासाठी बेस्टने केंद्र सरकारला विनंती केली आहे. ही विनंती मान्य झाल्यास बसमधील प्रत्येक प्रवाशाला हवेशीर खिडकी मिळणार आहे. 


एसटीमधली ‘स्लायडिंग विंडो’ म्हणजे मागेपुढे बसलेल्या प्रवाशांसाठी हमखास भांडणाचे कारण! अशाच खिडक्या गेल्या काही वर्षांपासून बसगाड्यांमध्येही दिसू लागल्या होत्या. केंद्र सरकारच्या ‘अर्बन ट्रान्सपोर्ट सिस्टम’ने (यूटीएस) सार्वजनिक परिवहन संस्थांना घालून दिलेल्या नियमानुसार बेस्टला ‘स्लायडिंग विंडो’ असलेल्याच गाड्या खरेदी कराव्या लागल्या होत्या. मात्र या खिडक्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असल्यामुळे या खिडक्यांची जाचक अट काढून टाकण्याची मागणी बेस्टने (यूटीएस) पत्राद्वारे केली आहे.

बेस्टच्या ताफ्यातील सध्या असलेल्या गाड्यांपैकी ११९ जुन्या गाड्या २०१५ मध्ये काढून टाकण्यात येणार आहेत तर १८० गाड्या २०१६ मध्ये काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे बेस्टला पुढील दोन वर्षांत नवीन ३५० गाड्या खरेदी कराव्या लागणार आहेत. या गाड्या खरेदी करण्यापूर्वी खिडक्यांची अट शिथिल झाल्यास जुन्याच पद्धतीच्या वरखाली झडप उघडणार्‍या मोकळ्या हवेशीर खिडक्या मिळू शकणार आहेत.

Post Bottom Ad