मुंबई / अजेयकुमार जाधव
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि एमआयएम या पक्षाचे नेते खासदार आसुद्दिन ओएसी हे बेताल वक्तव्य करत असल्याने देशामध्ये जातीय दंगली घडण्याची शक्यता आहे. देशामध्ये सर्व जाती धर्मामध्ये चांगले वातावरण राहावे यासाठी भागवत आणि ओएसी यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी देश बचाव आंदोलनाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मानवी हक्क आयोगाकडे केली आहे. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या एका महिन्यात उच्च नायायालयात दाद मागू असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
मागील काही दिवसा पासून या दोन्ही नेत्यांकडून हिंदू मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ मिर्माण करण्याचे आणि धर्मांतराचा मुद्दा पुढे केला जात आहे. हे दोन्ही नेते आपणच आपल्या धर्मियांचे नेते आहोत असा आभास निर्माण करून मतांचे राजकारण करत आहेत. नरेंद्र मोदी यांचे केंद्रात सरकार आल्यापासून या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगून आरएसएस ची नोंदणी रद्द करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तर एमआयएम या पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी इलेक्शन कमिशनकडे तक्रार देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. देशामधील लोकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून, दंगली होऊ नये म्हणून देश बचाव आंदोलन या संघटनेद्वारे राज्यभर व नंतर देशभर जन जागृती अभियान चालवले जाणार आहे. आम्ही सुरु केलेल्या जनजागृती अभियानाला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील, हनुमंत उपरे अश्या प्रतिष्ठित लोकांचा पाठींबा मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
