आणीबाणीच्या व्यवस्थापनासाठी एसटीचा स्वतंत्र सेल उभारणार - रावते - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आणीबाणीच्या व्यवस्थापनासाठी एसटीचा स्वतंत्र सेल उभारणार - रावते

Share This
मुंबई : प्रवाशांच्या आंदोलनामुळे शुक्रवारी मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा कोलमडली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याची तत्काळ दखल घेत दिवा ते ठाणे मार्गावर प्रवाशांसाठी ७0 एसटी बसेसची व्यवस्था केली. भविष्यात अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास व्यवस्थापन करणे सोयीचे व्हावे, यासाठी एसटीचा एक 'सेल' स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली. एसटीचे अपघात टाळता यावेत, यासाठी चालकांना यापुढे संगणकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहितीही दिवाकर रावते यांनी दिली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात ते पत्रकारांशी बोलत होते.

लुटणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

मध्य रेल्वे ठप्प झाल्यानंतर कामावर वा इच्छित स्थळी वेळेवर पोहोचता यावे, यासाठी प्रवाशांनी रिक्षांचा आधार घेतला. मात्र रिक्षाचालकांनी या वेळी चांगलेच हात धुऊन घेत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले. आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांना अशा प्रकारे लुटण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही दिवाकर रावते यांनी दिला. आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांची अशा प्रकारे लूट करणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही दिवाकर रावते यांनी सांगितले.

एसटी चालकांना संगणकाद्वारे प्रशिक्षण


एसटीचे अपघात टाळावेत व प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे शक्य व्हावे, यासाठी एसटी चालकांना संगणकाद्वारे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटीच्या लांबच्या प्रवासामुळे चालकावर ताण येत असतो. त्यामुळेही अनेकदा अपघात होतात. गाडी चालवताना अपघात होण्याची शक्यता दिसल्यास चालकाने नेमके काय करावे, वाहन चालवताना कोणती दक्षता घ्यावी आदी सर्व प्रशिक्षण आता संगणकाद्वारे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या नवृत्त कर्मचार्‍यांच्या औषधोपचारांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा विचारही सुरू असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages