पोलिसांचा बार, व्हिडीओ पार्लर्सवर कारवाईचा धडाका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलिसांचा बार, व्हिडीओ पार्लर्सवर कारवाईचा धडाका

Share This
मुंबई : 'थर्टी फस्र्ट'च्या रात्रीपासून मुंबई पोलिसांनी शहरातील बार, जुगार अड्डे आणि व्हिडीओ पार्लर्सवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. या मोहिमेंतर्गत बार आणि व्हिडीओ पार्लर्समध्ये बेकायदा कृती आणि नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या ११0 हून अधिक लोकांना पोलिसांना अटक केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने शहरातील बार मालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी मागील पाच दिवसांतील मोहिमेदरम्यान अनेक बारबालांची सुटका केली. एकीकडे, मुंबई शहर नववर्षाच्या पूर्वसंध्येला जोरदार सेलिब्रेशन करत होते, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांची समाजसेवा शाखा मात्र त्या रात्री बेकायदेशीररीत्या चाललेल्या कृतींवर करडी नजर ठेवून होती. या शाखेच्या अधिकार्‍यांनी नागपाडा, घाटकोपर आणि मुलुंड परिसरातील तीन बारवर छापा टाकून तेथील 'धांगडधिंगा' रोखला. तीन बारवरील कारवाईदरम्यान बारचा मॅनेजर आणि सुपरव्हायर्जस यांच्यासह एकूण ७६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (अंमलबजावणी) प्रवीण पाटील यांनी रविवारी दिली. 'थर्टी फस्र्ट'च्या रात्री कुर्ला येथील अनधिकृत व्हिडीओ पार्लरवरही छापा टाकण्यात आला. तेथे काम करणार्‍या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच काही डीव्हीडी आणि डीव्हीडी प्लेयर्सही हस्तगत करण्यात आले. शुक्रवारच्या रात्री पोलिसांच्या समाजसेवा शाखेने नागपाड्यातील जुगार अड्डय़ावर छापा टाकला आणि ११ जणांना अटक केली, तर घाटकोपर येथील लॉटरी सेंटरवर धाड टाकून ७ जणांना ताब्यात घेतले. त्याच रात्री दक्षिण मुंबईतही बारवरही छापा टाकून तेथील 'धिंगाणा' रोखण्यात आला व तेथून १४ जणांना अटक करण्यात आली. या धडक कारवाईच्या मोहिमेंतर्गत दोन रात्री ७ बारबालांची सुटका करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages