एसटीवर टोलचा भार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसटीवर टोलचा भार

Share This
मुंबई : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला टोलपासून मुक्ती देण्याची घोषणा गेल्या सरकारने केली होती. ती केवळ घोषणाच राहिल्यामुळे एसटीवर टोल कायमस्वरूपी राहिला आहे. फक्त नव्या टोलमध्ये एसटीला टोलमाफी दिल्याची घोषणा प्रत्यक्षात आल्याने नव्याने पडणारा भुर्दंड फक्त वाचला आहे. त्यातच गेल्या १४ वर्षांत टोलसाठी सुमारे ८८0 कोटी रुपये एसटी महामंडळाने खर्च केले आहेत.

राज्य सरकारकडे एसटी महामंडळाचे सुमारे २ हजार कोटी रुपये थकबाकी आहेत. एसटी महामंडळाला टोलमाफी करण्यात आली तर एसटीवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होईल, अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने घेतली होती. तशी घोषणाही करण्यात आली होती; परंतु त्याची अंमलबजावणी मात्र करण्यात आली नाही. परिणामी, टोलचा मुद्दा कायम राहिला. राज्यातील छोट्या-मोठय़ा टोल नाक्यांमुळे एसटीला २0१४ मध्ये १0४ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. टोल माफीच्या फसव्या घोषणेतील केवळ नव्या टोलमधून एसटीला मुक्त करण्याचा निर्णय अमलात आला आहे. त्यामुळे खारघर येथे नव्याने सुरू झालेल्या टोल नाक्यातून एसटीला वगळण्यात आले आहे. त्यामुळे एका बस फेरीमागे एसटीची ११७ रुपयांची बचत झाली आहे. अशीच टोलमाफी सर्वच ठिकाणी मिळाल्यास एसटीची वर्षाला किमान १00 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.सध्याचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी ४४ टोल नाक्यांवर माफी देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात हे छोटे-मोठे टोल बंद केल्याने तिथून सर्वच वाहनांना टोलमाफी मिळाली आहे. त्यामुळे एसटीला प्रत्यक्षात असा कोणताही फायदा झालेला नाही. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी टोलमाफीची केलेली घोषणा प्रत्यक्षात आल्यास परिस्थिती बदलेल, असा विश्‍वास एसटी अधिकार्‍यांना वाटत आहे.
वर्ष   टोलची रक्कम
२000-0१ ९ कोटी रुपये
२00१-0२ १३ कोटी
२00२-0३ १७.५0 कोटी
२00३-0४ २२ कोटी 
२00४-0५ २७ कोटी 
२00५-0६ ३५ कोटी
२00६-0७ ४५ कोटी
२00७-0८ ५६ कोटी
२00८-0९ ६१ कोटी
२00९-१0 ६७ कोटी
२0१0-११ ८१ कोटी
२0११-१२ ९९ कोटी
२0१२-१३ १0५ कोटी
२0१३-१४ १३४ कोटी 
२0१४-१५ १00 कोटी

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages