फडणवीस सरकार शपथविधी सोहळ्याचा खर्च ९८.३३ लाख ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फडणवीस सरकार शपथविधी सोहळ्याचा खर्च ९८.३३ लाख !

Share This
मुंबई : राज्यातील पहिल्या भाजपा सरकारचा 'शाही' प्रपंच सुरू करताना फडणवीस सरकारने शपथविधी सोहळ्यावर तब्बल ९८.३३ लाख खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात दुष्काळजन्य स्थिती आणि सरकारी तिजोरीत खडखडाट, अशी परिस्थिती असतानाही भाजपा सरकारने केलेल्या या उधळपट्टीबद्दल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा ३१ ऑक्टोबर, २0१४ रोजी वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सोहळ्यावर केलेल्या खर्चाची माहिती गलगली यांनी माहिती अधिकाराच्या आधारे महाराष्ट्र शासन आणि मुंबई भाजपाकडे मागितली होती. त्यांच्या अर्जाला अनुसरून महाराष्ट्र शासनातील अवर सचिव एस. जी. मोघे यांनी माहिती उपलब्ध करून दिली आहे. शपथविधीवर शासनातर्फे एकूण ९८ लाख ३३ हजार ८३0 रुपये खर्च झाला असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), इलाका शहर आणि कार्यकारी अभियंता (विद्युत) या विभागाने अनुक्रमे ६७,00,६६0 व ३0,६0,६७0 एवढय़ा रकमेची देयके मंजुरीसाठी सादर केली आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई) यांच्याकडूनही प्रवेशद्वारावर सुरक्षेच्या तपासणीसाठी लावण्यात आलेल्या डीएफएमडी/एमएचएमडी या भाड्यापोटी ७२,५00 एवढय़ा रकमेचे देयक मंजुरीसाठी प्राप्त झाले आहे. शासनाने अद्यापि कोणतीही रक्कम प्रदान केली नाही.

'भाजपा अपारदर्शक'
मुंबई भाजपाने अनिल गलगली यांच्या ३१ ऑक्टोबर २0१४ रोजीच्या अर्जाला साधे उत्तरही देण्याचे टाळले. स्वच्छ आणि पारदर्शक कामकाजाचा नेहमीच पुरस्कार करणारा भाजपा पक्ष आरटीआयला किंमत देत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. यातून मुंबई भाजपा 'अपारदर्शक' असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप गलगली यांनी केला आहे. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नेतृत्व असणार्‍या शरद पवारांच्या 'उदारवादी' धोरणावरही टीका केली आहे.

वानखेडे स्टेडियमच का?महाराष्ट्र शासनाने वानखेडे स्टेडियमच का निवडले? तसेच शपथविधी घेण्याबाबत असलेल्या नियमांची माहिती गलगली यांनी विचारली होती. त्यावर राज्यपालांच्या निर्देशांची प्रत देण्यात आली आणि शपथविधीबाबत कोणत्याही शासकीय अटी किंवा शर्ती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. २८ ऑक्टोबर, २0१४ रोजी राज्यपालांनी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी घेण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दिले होते

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages