महापालिकेच्या महासभेने अलीकडेच संमत केलेल्या नव्या 'पे अँड पार्किंग' धोरणाविरोधात कुलाब्यातील रहिवाशांनी दंड थोपटले आहेत. हे धोरण सर्वप्रथम पालिकेच्या 'ए' विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. 'ए' विभागात हे धोरण यशस्वी ठरल्यानंतर अन्य विभागांमध्ये राबवण्याचा निर्णय सत्तारूढ शिवसेनेने घेतला आहे.
महापालिकेने तयार केलेल्या नवीन 'पे अँड पार्किंग' धोरणामुळे वाहन चालकांना आता रस्त्यांवर वाहनांच्या पार्किंगसाठी शुल्क भरावे लागणार आहे. तर खाजगी सोसायटीतील रहिवाशांना सोसायटींसमोर दिवसा वाहने 'पार्क' करता येणार नाहीत तर रात्रीच्या वाहन पार्किंगसाठी दरमहा एक हजार ८00 रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे पालिकेच्या या नव्या पार्किंग धोरणास कुलाब्यातील अपक्ष नगरसेवक अँड़ मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा साळुंखे, माजी नगरसेवक विनोद शेखर यांच्यासह स्थानिक सोसायट्यांमधील रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे. या नव्या धोरणाविरोधात मुख्यमंत्री, महापौर व आयुक्तांना पत्र पाठवून या धोरणास स्थगिती देण्याची लेखी मागणी केली आहे. येत्या ७२ तासांत याविषयी योग्य तो निर्णय घेतला नाही तर लोकशाही मार्गाने विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
