भाजलेल्या व्यक्तीला नायर रुग्णालयाऐवजी सर्वप्रथम कस्तुरबा रुग्णालयातच उपचारांसाठी दाखल करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा उपस्थित मांडला होता. 'भाजलेल्या व्यक्तींना घेऊन त्यांचे नातेवाईक कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी जातात, पण त्या वेळी त्या रुग्णालयातील डॉक्टर प्रथम उपचारांसाठी नायर रुग्णालयात पाठवतात. मात्र कस्तुरबामध्ये दाखल करून घेत नाहीत. भाजलेल्या रुग्णाला कस्तुरबातून नायर रुग्णालयात नेताना रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजलेल्या रुग्णालयाला सर्वप्रथम कस्तुरबा रुग्णालयातच उपचार द्यावेत, असा प्रस्ताव प्रमिला शिंदे यांनी मांडला होता. हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत संमत झाला असून, भाजलेल्या व्यक्तीला नायरमध्ये दाखल करण्याऐवजी कस्तुरबात दाखल करून घेण्यात येणार आहे.
कस्तुरबा रुग्णालयात १ फेब्रुवारी १९९१ रोजी भाजलेल्या रुग्णांसाठी २५ खाटांचा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे अतिदक्षता सेवा रुग्णशय्या पाच, लहान मुलांसाठी तीन, पुरुष व महिलांसाठी अनुक्रमे सहा आणि सात, अग्निशमन दलासाठी दोन, 'पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी' खाटा दोन आहेत. प्रचलित पद्धतीनुसार फक्त महापालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयातून स्थलांतरीत केलेल्या ४0 टक्के वा त्यापेक्षा जास्त भाजलेल्या रुग्णांना व खाटांच्या उपलब्धतेनुसार या विभागात दाखल केले जाते. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या (पश्चिम उपनगरे) निर्देशानुसार कस्तुरबा रुग्णालयात 'मेडिको लिगल केसेस'साठी व्यवस्था केली असून, कस्तुरबात आलेल्या रुग्णांना तात्काळ दाखल करून घेण्याचे आदेश १५ डिसेंबर २0१३ पासून दिले आहेत.
