दप्तराचे ओझे कमी होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दप्तराचे ओझे कमी होणार

Share This
मुंबई : गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. मात्र असे असले तरी विद्यार्थ्यांचे बालपण हरवले जाणार नाही याची काळजी आपण शालेय शिक्षणमंत्री म्हणून निश्‍चितच घेऊ, असे सांगत पुढील वर्षापासून म्हणजेच जून २0१६ पासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी झालेले असेल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.


शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले टिळक विद्यालयातील मराठी, इंग्रजी आणि महानगरपालिकेच्या दीक्षित प्राथमिक मराठी शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद तर साधला. त्याचबरोबर विद्यार्थी शाळेत घेऊन आलेले दप्तर किती जड आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष वजनकाट्यावर वजन करून तपासले. या पाहणीत दप्तराचे वजन सरासरी ४ ते ६ किलो इतके असल्याचे त्यांना आढळले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांचेही वजनकाट्यावर वजन करून पाहिले. विद्यार्थ्यांच्या वयाच्या तुलनेत दप्तराचे ओझे निश्‍चितच जास्त असल्याचे त्यांना या पाहणीदरम्यान आढळून आले. शालेय विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी आपण तातडीने पावले उचलणार असल्याचे सांगत, यासाठीच आपण प्रत्यक्ष शाळांना भेट देत आहोत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत, असे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी तावडे यांच्यासोबत स्थानिक आमदार पराग अळवणी, मुंबई महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शेलार हेही उपस्थित होते.तावडे म्हणाले की, राज्य शासनामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याबाबत उपाययोजना करणार आहे. शालेय शिक्षणमंत्री म्हणून आपण शाळांमध्ये दप्तराच्या ओझ्याविषयी जी पाहणी केली त्यात आढळलेल्या बाबी आपण या समितीसमोर मांडणार आहोत, असे तावडे यांनी सांगितले. याशिवाय महाराष्ट्रातही तामिळनाडूच्या धर्तीवर तीन सत्रांत परीक्षा आणि त्यानुसार अभ्यासक्रम आखणी करणे शक्य आहे का, हेही तपासले जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व भाषा एकत्र आणि गणित, विज्ञान अशी विभागणी करता येईल का, शाळेत विविध विषयांच्या तासांचे जे वेळापत्रक आहे ते बदलता येऊ शकेल का, एकाच दिवशी विषयानुसार विभागणी करून जास्त वेळचे तास करता येतील का, पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन, सर्व विषयांची दर तिमाही अभ्यासक्रमानुसार परीक्षा, याबाबतही विचार करण्यात येईल, असे ते या वेळी म्हणाले. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत तावडे यांनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारला. विविध विषयांचे दररोजचे वेळापत्रक कमी असावे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लॉकर्स देण्यात यावीत, विविध प्रोजेक्ट्सच्या वह्या शाळेतच ठेवण्यात याव्यात, विषयानुसार एक वही आणि शीट्स असाव्यात, अशा काही सूचना विद्यार्थ्यांनी तावडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केल्या. या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आठवीच्या मुलांना टॅब दिले जाणार आहेत. हे टॅब विद्यार्थी कसे हाताळतात, तसेच टॅबची विद्यार्थ्यांंना किती उपयुक्तता आहे, हे तपासल्यानंतर मगच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देता येतील का, याबाबतही विचार करण्यात येईल, असेही तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages