मुंबई महानगर पालिकेत शिवसेना आणि भाजपा या पक्षाची गेले २२ वर्षे सत्ता असून या कालावधीत मागासवर्गीयांची पदेच भरली जात नसल्याने मागासवर्गीयांचा मोठ्या प्रमाणात अनुशेष निर्माण झाला आहे. पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना पालिका प्रशासन आणि सामान्य प्रशासन ज्यांच्या अखत्यारीत होते असे अडाणी कारभार करणारे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी नेहमी मागासवर्गीयांची कोणतीही पदे रिक्त नसल्याचे सांगत होते. पालिकेमध्ये नेमकी किती पदे रिक्त आहेत याची माहिती आनंद पारगावकर यांनी माहिती अधिकारातून मिळवली असता पालिकेचे पितळ उघडे पडले होते. मुंबई महानगर पालिकेमध्ये अ, ब, क, ड, अशा चार वर्गामध्ये जवळपास १ लाख २० हजार कर्मचारी काम करत आहेत. यापैकी सहप्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी १५ डिसेंबर २०११ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना दिलेल्या माहितीनुसार मागासवर्गीयांचा पालिकेमध्ये १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असल्याचे कळविले होते.

पालिकेने दिलेल्या माहितीत ३० जून २०११ रोजीच्या आकडेवारी नुसार पालिकेच्या अ, ब, क, ड, अशा चार वर्गामध्ये सरळसेवा भर्तीद्वारे ८६०४४ पदे मंजूर आहेत त्यापैकी ६५६९८ पदे भरली असून २०३४६ पदे रिक्त आहेत तर एस सी ची २११७, एस टी ची ३१०३, विजे (अ) ची १२४३, एन टी (ब) ची ९६४, एन टी (सी )ची १३७०, एन टी (डी )ची ९८२, एस बी सी ची ८६४, ओ बी सी ची ४१६६ अश्या एकूण १४८३९ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले होते. तर पदोन्नतीद्वारे २४१०५ पदे मंजूर आहेत त्यापैकी १४८४४ पदे भरली असून ९२६१ पदे रिक्त आहेत. एस सी ची ९१० , एस टी ची १०६९ , विजे (अ) ची ४२७ , एन टी (ब) ची ३२६ , एन टी (सी )ची ५३९ , एन टी (डी )ची ३५८ एस बी सी ची ३४३ अश्या एकूण ३९७२ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे सरळ सेवा व पदोन्नतीद्वारे मागासवर्गीयांचा जवळपास १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असताना खुल्या वर्गातील कोणत्याही पदांचा अनुशेष बाकी नसल्याचे म्हटले होते.
माहिती अधिकारातून मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त असल्याचे उघड झाल्यावर सातत्याने दैनिक "जनतेचा महानायक" मधून हि रिक्त पदे भरण्यासाठी गेले २ वर्षे बातम्या आणि लेख लिहून पाठपुरावा केला जात आहे. पालिकेतील मागासवर्गीयांची रिक्त पदे त्वरित भरावीत म्हणून पालिकेवर दबाव आणण्यासाठी काही लोकांनी एससी एसटी आयोगाकडेही दाद मागितली. परंतू पालिकेच्या प्रशासनाचा कारभार बघणाऱ्या अडाणी अतिरिक्त आयुक्त अडतानी यांनी एससी एसटी आयोगाला पालिकेत मागासवर्गीयांची कोणतीही पदे रिक्त नसल्याची खोटी माहिती देणारे पत्र दिले होते. यावर पुन्हा महानायक मधून आवाज उचलल्यानंतर पालिकेच्या सर्वोच्च अश्या सभागृहात हा विषय गाजला. आणि मुंबई महानगर पालिकेत मागासवर्गीय व इतर अशी सर्व २८ हजार पदे रिक्त असल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली. मुंबई महानगर पालिकेत २८ हजार पदे रिक्त असल्याने हि पदे त्वरित भरण्याचे आदेश तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी पालिका सभागृहात प्रशासनाला दिले. पालिका प्रशासनाने या आदेशाची अमलबजावणी करत आहोत हे दाखवण्यासाठी ९०० पदांची भरती सन २०१४ मध्ये केली. परंतू इतर पदे भरण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.
आता पुन्हा पालिकेच्या मागासवर्गीय कक्षाने ३१ / १२ / २०१३ पर्यंतची एक वार्षिक माहिती पालिका सभागृहापुढे ठेवली आहे. यामध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण नसलेली एकाकी व सफाई कामगारांची पदे वगळून सरळसेवेची एकूण पदे ८४२७० आहेत त्यापैकी ६८३७४ पदे भरली असून तदर्थ तत्वावर २६२ पदे भरली आहेत. ८४२७० पैकी ६८६३६ पदे भरली असून १५६३४ पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. सरळसेवेद्वारे ५२ टक्के आरक्षणाद्वारे ८४२७० पैकी ३५३८१ पदे असून त्यापैकी ३२५३९ पदांवर मागासवर्गीय कर्मचारी कार्यरत आहेत तर २८३२ पदांच अनुशेष बाकी असल्याचे महटले आहे. तसेच ३१ / १२ २०१३ रोजी पदोन्नतीद्वारे कर्मचाऱ्यांची २३७१६ पदे आहेत त्यापैकी १३६०६ पदे भरली असून तदर्थ तत्वावर १७०१ पदे भरली आहेत अशी एकूण १५३०७ पदे भरली आहेत तर १०११० पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. या पदोन्नतीच्या २३७१६ पदांपैकी ३३ टक्के आरक्षणाची ५४४५ पदे आहेत त्यापैकी ४१६२ पदांवर मागासवर्गीय कर्मचारी कार्यरत असून १२८३ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे. मागासवर्गीयांची पदे रिक्त असताना सरळसेवेची खुल्या प्रवर्गाची ३६०८७ व पदोन्नतीची १११४५ पदे भरली असल्याने एकही पद रिक्त नसल्याचे म्हटले आहे. हा वार्षिक अहवाल मंगळवारी १० फेब्रुवारी २०१५ ला पालिका सभागृहा पुढे सदर होणार असून यावर कोणतीही चर्चा न होता दफ्तरी दाखल केला जाणार आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या सहप्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी माहिती अधिकारातून डिसेंबर २०११ पर्यंत १९ हजार पदे रिक्त असल्याचे कळविले आहे. हि पदे रिक्त असल्याचे प्रशासन माहिती अधिकारातून मान्य करत असले तरी एससी एसटी आयोग आणि इतरांना मात्र हि पदे रिक्त नसल्याचे सांगते. एकीकडे मागासवर्गीयांची पदे रिक्तच नसल्याचे सांगणारे पालिका प्रशासन सभागृहात मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील २८ हजार पदे रिक्त असल्याची कबुलीही देते. माहिती अधिकारातून १९ हजार मागासवर्गीयांची पदे रिक्त असल्याची माहिती दिल्या नंतर पालिकेमध्ये कोणतीही मागासवर्गीय पदे भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. मग हि रिक्त पदे कधी आणि कशी भरली ? मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष इतका कमी कसा झाला ? माहिती अधिकारात पालिकेचे सहप्रमुख कर्मचारी अधिकारयानी खोटी माहिती दिली कि मागासवर्गीय कक्ष खोटी माहिती सादर करत आहे ? पालिका सभागृहात हा अहवाल सादर होणार असल्याने याच सभागृहात २८ हजार पदे रिक्त असल्याचे मान्य करण्यात आले आणि हि पदे त्वरित भरण्याचे आदेश दिले होते त्याचे काय ? यासर्व प्रश्नाची पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यानी उत्तर देण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment