मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या उंदरांच्या संखेमुळे मुंबईकर जनतेच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी कामाला लागल्या आहेत. रिक्त असलेली मूषक नाशकांची ( रात्री उंदीर मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची ) पदे त्वरित भरावी असे आदेश मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी दिले आहेत.
मुंबई महानगर पालिकेद्वारे रात्रीच्या वेळी उंदीर मारण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्यांना नाईट ऱ्याट किलर असे बोलले जाते. या कर्मचाऱ्यांची पालिकेने सध्या ४४ पदे भरली असून ८४ पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांनी सन २०१४ मध्ये २ लाख ७९ हजार उंदरांना मारले असून सन २०१३ मध्ये ३ लख ३१ हजार मारण्यात आले होते. सन २०१४ पेक्षा सन २०१३ मध्ये ५२ हजार उंदीर जास्त मारण्यात आले होते. सन २०१३ मध्ये दरदिवशी ९०७ उंदीर मारले जात होते कर्मचारी कमी असल्याने सन २०१४ मध्ये हे प्रमाण कमी होऊन दर दिवशी ७६४ उंदीर मारण्यात आले आहेत. सध्या पालिकेमध्ये ८४ मूषक नाशकांची ८४ पदे रिक्त असल्याने मुंबई मध्ये उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरासाठी मूषकनाशकांची रिक्त असलेली ८४ पदे भरवित म्हणून गेल्या तीन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित आहे. पालिका प्रशासन आणि पालिकेचा आरोग्य विभाग मूषक नाशकांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सध्या मुंबईमध्ये उंदरांचा सूळसुळाट झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.मुंबईमध्ये उंदरांचा सूळसुळाट वाढल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्याची दखल घेत पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी मूषकनाशकांची ८४ रिक्त पदे त्वरित भरण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
