मुंबई, दि. 23: नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 22 एप्रिल 2015 रोजी मतदान होणार आहे त्यासाठी आज मध्यरात्री 12 पासून आचारसंहिता लागू होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे केली.
सहारिया यांनी सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111; तर औरंगाबाद महानगरपालिकेच्या 113 पदांसाठी ही निवडणूक होत आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 31 मार्च 2015 ते 7 एप्रिल 2015 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. 8 एप्रिल 2015 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल, त्यानंतर लगेचच नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 10 एप्रिल 2015 रोजी दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 11 एप्रिल 2015 रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्याचदिवशी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील; तसेच मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 22 एप्रिल 2015 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होईल. 23 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरु होईल. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक राहील. छाननीच्यावेळी मूळ जातप्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तपासण्याकरीता सादर करावे लागेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार ते कार्यवाही करतील, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक: 31 मार्च 2015
नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे : 31 मार्च ते 7 एप्रिल 2015
नामनिर्देशनपत्रांची छाननी : 8 एप्रिल 2015
नामनिर्देशनपत्रे मागे घेणे : 10 एप्रिल 2015
निवडणूक चिन्हांचे वाटप : 11 एप्रिल 2015
मतदानाचा दिनांक : 22 एप्रिल 2015
मतमोजणीचा दिनांक : 23 एप्रिल 2015