महापौर हटाव मुंबई बचाव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौर हटाव मुंबई बचाव

Share This
मुंबई महानगर पालिकेच्या सन 2015-16 च्या 33 हजार 500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने 500 कोटी रुपयांची अधिकची तरतूद केली आहे. या 500 कोटी पैकी 100 कोटी रुपये बेस्ट्ला देण्यात आले. उरलेले 400 कोटी रुपयांचे सर्व 227 नगरसेवकांना देण्यात आले. उरलेल्या १७३ कोटी रुपयांचे सर्व राजकीय पक्षांना समान वाटप न करता भाजपा ३० नगरसेवकांसाठी ला 32 कोटी, मनसेला २९ नगरसेवकांसाठी 5 कोटी, राष्ट्रवादीला १२ नगरसेवकांसाठी 5 कोटी, कोंग्रेसला ५२ नगरसेवकांसाठी 7 कोटी तर शिवसेनेला ७५ नगरसेवकासाठी 120 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजपा या सत्ताधार्यांनी उरलेला निधी सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या नगरसेवकांच्या संखेप्रमाणे वाटप करावा अशी मागणी विरोधी पक्षातील नगरसेवकांची होती. परंतू सत्ताधाऱ्यानी आपल्यालाच जास्त निधी घेत असल्याने विरोधी पक्षावर, नगरसेवकावर अन्याय केला आहे. याबाबत विरोधी पक्षातील काँग्रेसने याचा निषेध नोंदवत संताप व्यक्त करून सभागृहात गोंधळ केला. आणि स्थायी समितीमधे तरतूद केलेल्या अर्थसंकल्पाची पुस्तके फाडून सभागृहात भिरकावली. सभागृहात गोंधळ झाल्याने काँग्रेसच्या पारुल मेहता, अनिता यादव, अजंता यादव, शीतल म्हात्रे, वकारउन्नीसा, नयना शेठ या 6 नगरसेविकाना सोमवारी ९ मार्चला एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. 

शिवसेना आणि भाजपाने स्वताच्या पदरात पाडून घेतलेला हा निधी त्यांनी पक्षाकडून किंवा त्यांच्या खिश्यातून आणलेला नाही. हा निधी मुंबईकर जनता जो कर भरते त्या मधील हा निधी आहे. हा निधी फक्त सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि शिवसेना पक्षातील मोजक्या नगरसेवकांच्या विभागातील कामासाठी वाटला जाणार आहे. हा निधी सर्व मुंबईकर जनतेचा असल्याने सर्व मुंबई मधील विभागात याचा समान वापर केला गेला पाहिजे अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. हि मागणी बरोबर असली तरी सत्ताधार्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करून संपूर्ण मुंबईकर जनतेवर अन्याय सुरूच ठेवला असल्याने सभागृहात गोंधळ घालण्यात आला. मंगळवारी १० मार्चला पालिका सभागृहामधील नियमाप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर हे विरोधी पक्ष नेत्याला असलेल्या अधिकाराप्रमाणे मुंबईमध्ये हाहाकार माजवणाऱ्या स्वाईन फ्लू रोगा बाबत निवेदन सादर करणार होते. परंतू महापौरांनी त्यांना हे निवेदन सादर करण्यास दिले नाही. यामुळे सभागृहात पुन्हा गोंधळ घालण्यात आला आणि या गोंधळात ९ मार्चला निलंबित केलेल्या काँग्रेसच्या ६ नगरसेविकांना पुन्हा १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. निलंबित नगरसेवकांचे निलंबन रद्द करावे आणि पुढील बैठकी पासून या नगरसेवकांना सभागृहात बसण्यास द्यावे असे गट नेत्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करावी अशी अट घालण्यात आली. विरोधी पक्ष नेत्यांनी तीन वेळा सभागृहात दिलगिरीही व्यक्त केली परंतू महापौरांनी वेग वेगळी वक्तव्य करत निलंबन रद्द करण्याच्या आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली. 

गुरुवार १२ मार्च रोजी महापौर आपला दिलेला शब्द पाळत नसल्याने सभागृहात गोंधळ चालूच राहिला सभागृह १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. महापौर आपला शब्द पाळत नसल्याने निलंबित नगरसेविकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सत्तेचा गैरवापर करत पालिकेच्या नियमाप्रमाणे सुरक्षा रक्षकांना नगरसेवकांना पालिका सभागृहात जाण्यापासून रोखण्याचा कोणताही अधिकार नसतानाही सुरक्षा रक्षकांकडून निलंबित नगरसेविकांना सभागृहात जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाली. याचा फटका इतर नगरसेवक आणि गटनेत्यांना बसला. वास्तविक पाहता या निलंबित नगरसेविकांनी सभागृहात प्रवेश केला असता तर त्यांच्यावर नियमानुसार निलंबन वाढवण्याची, पोलीसांकडे तक्रार करण्याची, कोर्टात जाण्याचे मार्ग होते परंतू सभागृह चालवण्यात अपयशी ठरत असलेल्या मुंबईच्या महापौरांनी थेट सत्तेचा गैरवापर करणे सुरूच ठेवले आहे. 

गुरुवारी नगरसेवकांना सभागृहात जाण्यापासून अडवल्याने आणि सुरक्षा रक्षक यांच्या सोबत झालेल्या मारहाणीनंतर नगरसेविकांचे निलंबन मागे घेण्याचा शब्द महापौर पाळत नसल्याने शुक्रवारी १३ मार्चलाही सभागृहात गोंधळ सुरूच राहिला. या गोंधळावेळी महापौरांनी विरोधी पक्षातील मनसेला हरकतीचा मुद्दा मांडायला परवानगी देवून विरोधकांमध्ये फुट पाडली. राष्ट्रवादी पक्षानेही शरद पवारांचेच आम्ही चेले असल्याचे दाखवत सोयी प्रमाणे भूमिका बदलली आणि सभागृहांत हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले. यादरम्यान सभागृहात शिट्या वाजवल्याने काँग्रेसच्या ललिता यादव, गीता यादव, योगेश भोईर, सागर ठाकुर, शिवा शेट्टी, ब्रायन मिरिन्डा या आणखी ६ नगरसेवकाना निलंबित करण्यात आले.  यामुळे एकटी पडलेली काँग्रेस आणखी आक्रमक झाली आणि सभागृह १० मिनिटासाठी तहकूब कण्यात आले. या १० मिनिटाच्या काळात शिवसेनेचे राजू पेडणेकर, अनिल सींग, मिराज शेख हे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडे धावून गेले आणि काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेड़ा, सागर ठाकूर यांना धक्काबूककी केली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांवर हल्ला केल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनीही त्याला प्रतीउत्तर दिले. हा प्रकार सभागृहात १५ - २० मिनिटे सुरूच होता. शेवटी मनसे आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकानी मध्यस्ती करून दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना शांत केले. 

या घडल्या प्रकाराबाबत बोलताना लोकशाहीचा आणि विरोधी पक्षाचा गळा घोटण्याचे काम महापौर करत आहेत. शिवसेनेची हिटलर शाही सुरु असून शिवसेना भाजपाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे प्रवीण छेड़ा यानी सांगीतले. दर रोज ६ नगरसेवक या प्रमाणे काँग्रेसचे सर्व ५२ नगरसेवक निलंबीत केले तरी आमचे हे आंदोलन चालूच राहील. निलंबीत नगरसेवकांचे निलंबन जो पर्यंत मागे घेत नाही तो पर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही असा  इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या इशारया प्रमाणे सोमवारी १६ मार्च पासून सभागृहात पुन्हा गोंधळ होणार हे नक्की झाले आहे. सभागृह चालवून मुंबईकर जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यात महापौर स्नेहल आंबेकर अपयशी ठरल्या आहेत. महापौर आपल्या शब्दावर कायम राहिलेल्या नाहीत, ज्या महापौर गटनेत्यांना सभागृहाला दिलेला शबद पाळत नाहीत त्या महापौर मुंबईकर जनतेला दिलेला शब्द पाळतील याची आता खात्री राहिलेली नाही. काँग्रेसच्या ज्या नगरसेविकांना निलंबित केले आहे त्यांनी पालिका सभागृहाचा अवमान केला आहे. सभागृहाचा अवमान करणाऱ्या नगरसेविकांना सभागृहात माफी मागावी असा नियम असताना महापौर स्नेहल आंबेकर या हट्टाला पेटल्या असून माझ्या दालनात येवून नगरसेविकांनी माफी मागावी तरच निलंबन रद्द करेन अशी वक्तव्य करत आहेत. महापौरांचा हट्ट पूर्ण व्हावा म्हणून सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि शिवसेनेच्या इतरांची त्याला साथ मिळत आहे. याप्रकारामुळे शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे असा संदेश गेल्या आठवडाभरात सामान्य मुंबईकर जनतेपर्यंत गेला आहे. 

महापौर स्नेहल आंबेकर यांच्या सुरु असलेल्या पालिकेतील कारभारामुळे विरोधी पक्ष आणि अनेक नगरसेवक त्रस्त आहेत. पालिकेचे सभागृह चालवण्यात महापौरांना अपयश येत आहे. सभागृहातील नियम त्या आपल्या सोयी प्रमाणे लावून घेत असतात. सभागृहामध्ये जितका सत्ताधारी पक्ष महत्वाचा असतो तितकाच विरोधी पक्ष सुद्धा महत्वाचा असतो. आपण लोकशाही असलेल्या भारतातील मुंबई शहराच्या प्रथम नागरिक आहोत, आपण फक्त शिवसेना पक्षाच्या नव्हे तर मुंबई शहराच्या महापौर आहोत याचा विसर स्नेहल आंबेकर याना पडत चालला आहे. त्या एखाद्या हिटलरशाही देशातील सत्ताधारयाप्रमाणे वागत आहेत. याच सभागृहात काँग्रेसच्या एका नगरसेविकेची साडी फाडण्यात आली होती. हि साडी फाडणारे सत्ताधारी होते. त्यांना कधीही निलंबित केले गेले नाही. शुक्रवारी याच सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांना मारहाण करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक धावून गेले. काँग्रेसच्या नगरसेवकांना धक्काबुक्की केली गेली. एक महिला नगरसेविकेला शिवीगाळ करण्यात आली. हे काम करणारे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक आणि नगरसेविका होते. सत्ताधारी नगरसेवक आणि नगरसेविकांना वेगळा न्याय आणि विरोधी पक्षातील नगरसेवक आणि नगरसेविकांना वेगळा न्याय हा पक्षपाती पणा महापौरांनी चालवला आहे. 

स्नेहल आंबेकर या पहिल्यांदाच नगरसेविका बनल्यावर त्यांना ३ वर्षातच महापौर या पदावर बसण्याचामान मिळाला आहे. परंतू त्यांनी या पदावर बसल्या पासून सतत वादग्रस्त वक्तव्य आणि कामे करून या पदाचा अवमान करण्याचे काम सुरु ठेवले आहे. महापौरांच्या कारभारावर पालिकेचे प्रशासनही त्रस्त झाले आहे. महापौरांना प्रशासनिक कामाची कोणतीही माहिती नसताना त्या आपल्याला सर्व माहित असल्याचा दिखावा करत असतात. महापौरांच्या या प्रकारामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरापासून लांब राहणे पसंद केले आहे काही अपवाद वगळता महापौरांकडे जाण्यास कोणीही अधिकारी तयार नसतात. महापौरांच्या या वागण्याचा शिवसेनेला येत्या २०१७ च्या निवडणुकीमध्ये चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपा १०० टक्के सत्ता काबीज करण्याची तयारी करत असताना महपौर त्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हि शिवसेनेसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. महापौरांच्या कार्याची दखल स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षातील नेत्यांनी घेण्याची गरज आहे. ज्या महापौरांना पालिकेचा कारभार येत नाही, ज्या महापौरांमुळे मुंबईचे, मुंबई महानगर पालिकेचे आणि सत्ताधारी पक्षाचे नाव खराब होते अश्या महापौरांची पदावरून त्वरित उचलबांगडी करणेच योग्य ठरणार आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

















No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages