सामाजिक बहिष्कार रोखण्यासाठी तीन महिन्यांत कायदा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सामाजिक बहिष्कार रोखण्यासाठी तीन महिन्यांत कायदा - मुख्यमंत्री

Share This
मुंबई : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. एखादी व्यक्ती किंवा संपूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकण्याची ही प्रथा अतिशय वाईट आहे. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी येत्या तीन महिन्यांत ठोस तरतूद असणारा कायदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
जातपंचायतींच्या माध्यमातून व्यक्ती किंवा कुटुंबाचा छळ करून त्यांना वाळीत टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. बहिष्कार मागे घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात येते. याबाबत राणा जगजितसिंह पाटील, बच्चू कडू, राहुल मोटे आदींनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अशा प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या सूचनेवर निवेदन देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकट्या रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे ३४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील २८ प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सांगितले. बहिष्काराच्या वाढत्या घटना लक्षात घेता गुन्हेगारांना जरब बसेल, असा कायदा करण्यात येणार आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विधि व न्याय विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. नागरिकांकडूनदेखील याबाबतच्या सूचना मागवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages