कॅम्पा कोलातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॅम्पा कोलातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

Share This
मुंबई : वरळीतील वादग्रस्त कॅम्पा कोला गृहसंकुलातील ज्या घरांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, तो तात्पुरता पूर्ववत करण्याची मागणी बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आली. माणुसकीच्या नात्याने आणि या इमारतींमधील रहिवाशांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने वीज पुरवठा पुन्हा सुरू करावा, असे भावनिक आवाहन सदस्यांनी केल्यानंतर यासंदर्भात पालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी समितीला सांगितले. 

वादग्रस्त कॅम्पा कोलातील अनधिकृत फ्लॅटला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता नियमित केले जाणार आहे. त्यामुळे या फ्लॅटधारकांचा खंडित केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी बेस्ट समितीमधील मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी केली. कॅम्पामधील पाच मजल्यांवरील काही इमारतींचे ९८ फ्लॅट बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते. या अनधिकृत फ्लॅटवर कारवाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने हे बेकायदेशीर फ्लॅट नियमित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे महापालिकेनेही हे फ्लॅट नियमित करण्याची हालचाल सुरू केली आहे. 'मानवतेच्या दृष्टिकोनातून व कॅम्पामधील रहिवाशांच्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे 'त्या' फ्लॅटचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होंबाळकर यांनी केली. समितीमधील सदस्य सुहास सामंत यांनीही त्यांना पाठिंबा दिला. सदस्यांच्या या भावना लक्षात घेऊन, 'याविषयी पालिकेच्या आयुक्तांना तत्काळ पत्र लिहिण्यात येईल आणि त्यांच्या मंजुरीनंतर कॅम्पामधील खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे समितीला सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages