महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी व त्यांच्यातील कलात्मक जाणिवा विकसित होऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना अधिकाधिक वाव मिळावा, यासाठी महापालिका सदैव कटिबद्ध आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुतारकाम, भरतकाम, शिवणकाम यासारख्या विविध व्यावसायिक कलांचे शिक्षण महापालिका शाळांतून नियमितपणे विद्यार्थ्यांना दिले जाते, हे महापालिका शाळांचे असणारे वेगळेपण लक्षात घेता मुंबईतील शिक्षण क्षेत्रात महापालिका शाळांचे स्थान अढळ आहे, असे गौरवोद्गार मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी काढले.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या हिंदू कॉलनी, दादर येथील सभागृहात आयोजित कार्यानुभव कलाकृती स्पर्धा पारितोषिक वितरण आज (दिनांक २५.०३.२०१५) आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. पारितोषिक वितरण समारंभात उपस्थितांशी संवाद साधताना महापौर स्नेहल आंबेकर यांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कलागुणांचे कौतुक करीत शालेय शिक्षणात कार्यानुभवाचे व व्यावसायिक कलांचे महत्त्व अन्ययसाधारण असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती ह्या अत्यंत आकर्षक आणि उत्कृष्ट दर्जाच्या आहेत, हे लक्षात घेता व महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे कलागुण अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने पुढीलवर्षापासून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन हे आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्याचा व त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी कामातून आनंद आणि आनंदातून काम या भावनेने कार्य करणे व उत्कृष्टतेचा ध्यास धरणे आवश्यक असल्याचे नमूद करीत आपण इतरांना आनंद देणे जेवढे आवश्यक आहे,तेवढेच स्वतःलाही आनंद देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या कामातच आनंद शोधण्याची सवय आपण स्वतःला लावून घ्यावी आणि निर्मितीतील आनंद शोधावा आणि वाढवावा असे सांगितले. आजच्या धावपळीच्या आयुष्यात कोणत्याही कलेची नियमित साधणा ठेवल्यास त्यातून आपल्याला दैनंदिन जीवनातील ताणतणावावर विजय मिळवता येऊ शकतो व खऱया अर्थाने आपल्या जीवनातील आनंद वाढविता येऊ शकतो, असे प्रतिपादनही शेलार यांनी केले.
बालभारती, पुणे येथील विशेषाधिकारी (कार्यानुभव) डॉ. अजयकुमार लोळगे यांनी आपल्या भाषणात कार्यानुभवांतर्गत असणाऱया विविध विषयांचे महत्त्व विस्ताराने सांगितले. त्याचबरोबर ‘श्रमप्रतिष्ठा’ हे कार्यानुभव विषयांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नमूद करीत त्यानंतर ‘मर्यादित स्वरुपात अर्थोत्पादन’ आणि ‘आनंददायी शिक्षण’ हीदेखील कार्यानुभवाची उद्दिष्ट्ये असल्याचे सांगितले. तसेच पुढील वर्षापासून ‘ज्वेलरी डिझायनिंग’ व ‘मत्स्य व्यवसाय’ हे विषयदेखील कार्यानुभवांतर्गत वैकल्पिक स्वरुपात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगितले.