बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणारे अपघात कमी व्हावेत व वाहतूक अधिकाधिक सहज व सुरळीत होण्यास मदत व्हावी या प्रमुख उद्देशाने `ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने पाच वर्षे कालावधीसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे; तसेच मुंबईतील रस्त्यांवरील सुरक्षेबाबत महापालिका सदैव कटिबद्ध् व सजग आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले. `मुंबई रोड सेफ्टी इनिशिएटिव्ह' या प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या प्रारंभिक कार्यशाळेला मार्गदर्शन करताना कुंटे बोलत होते.
या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात बोलताना महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी `ग्लोबल रोड सेफ्टी' हा प्रकल्प राबविण्यासाठी जगभरातील ज्या दहा शहरांची निवड करण्यात आली, त्यामध्ये भारतातील मुंबई शहराची निवड केल्याबद्दल `ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज' या संस्थचेआभार मानले व मुंबई शहरात हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.तसेच मुंबई शहरातील रस्ते व रेल्वे अपघातांची कारणमीमांसा करताना श्री.कुंटे यांनी मोबाईल फोन, आयपॉड यासारख्या आधुनिक उपकरणांचा अमर्याद वापर व रस्त्यावर चालताना गाणी ऐकणे, फोनवर बोलणे यासारख्या बाबींमुळे दुर्दैवी अपघात होत असल्याचे नमूद करत याबाबत आणि अपघातांच्या इतर कारणांबाबत सर्व स्तरावर जनजागृती करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येईल असे सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते हे पादचारी व वाहनांसाठी अधिकाधिक सुरक्षित करण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येऊन संबंधित सर्व संस्थांशी योग्य तो समन्वय साधण्याचे काम देखील महापालिकेद्वारे सुयोग्य प्रकारे केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.