मुंबई दि. 18 – वांद्रे-खार 15 वा रस्ता येथे रविवारी 2 अज्ञान इसमांनी मुलींचा सार्वजनिक ठिकाणी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी खार पोलिसांनी तक्रार दखल करून घेण्यास टाळाटाळ केली. याबाबत आज मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांना स्वतः चौकशी करून आहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या 15 वा रस्ता परिसरात रविवारी काही मुली रस्त्याने जात असताना दोन अज्ञात तरुणांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध करणाऱ्या दोघींना त्यांनी मारहाण करून जखमी केले. या तरुणांच्याकडे असणाऱ्या बाईक वर पोलीस असेही लिहिले होते. यातील 2 मुलींनी या घटनेची खार पोलीस स्टेशनमध्ये माहिती देऊन तक्रार दखल करण्याची विनंती केली. मात्र खार पोलिसांनी तक्रार दखल करून घेतली नाही. याबाबतची बातमी आज प्रकाशित झाल्या नंतर वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस आयुक्तांकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली. या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पोलीस आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले असून, आपण स्वतः चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करा असे निर्देश ही मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना दिले आहेत.