मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या घरांना लावण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कराचे आतापासूनच पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे गुरुवारी मंजूर पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर केलेल्या प्रस्तावावर पालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आज सभागृहात उपसूचना मांडताना ५०० चौरस फुटाच्या घरांना सवलत देण्याची मागणी केली. या उपसूचनेला भाजपाचे गटनेते मनोज कोटक आणि कॉंग्रेसचे नगरसेवक प्रविण छेडा यांनी अनुमोदन दिल्याने हा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करातून सवलत मिळणार आहे.
पूर्वीच्या करप्रणालीत ५०० चौरस फुटाच्या आतील घरांना मालमत्ता करातून वगळण्यात आले होते. पंरतु काल स्थायी समितीत मंजूर केलेल्या प्रस्तावात या घरांनाही मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मालमत्ता करात सामान्य मुंबईकरांवर आर्थिक बोजा लादला जाईल, या स्वरूपाचे वृत्त प्रसारामाध्यमानी प्रकाशीत केले. परिणामी त्याचा फटका आगामी पालिका निवडणूकीवर होण्याची भीती व्यक्त करीत शिवसेनेने आज सभागृहात करवाढी विरोधात सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी उपसूचने द्वारे मांडली. यावेळी मागील वर्षाच्या सरकारने २०१०-२०१५ या कालावधीकरीता ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करातून वगळले होते. त्याप्रमाणे पुढील पाच वर्षेही या घरांना मालमत्ताकरातून वगळावे, अशी मागणी केली. या मागणीला महापौर स्नेहल आंबेकर यांनी हिरवा कंदील देत पालिका सभागृहात एकमताने प्रस्तावास मंजूरी दिली. याचा फायदा आता सात लाख मुंबईकरांना होणार आहे.
मालमत्ता करात ११.७४ टक्के वाढ निवासी घरांसाठी मोकळ्या भुखंडांच्या मालमत्ता करात २९ टक्क्यांनी वाढ केली. तसेच ५०० चौरस फुटाच्या घरांच्या मालमत्ता करात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता सत्ताधारी पक्ष शिवसेना- भाजपाने मंजूरकेला होता. यावर प्रसार माध्यमांनी टीकेची झोड उठविल्या नंतर मालमत्ता करातील वाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यमवर्गीयांवर होणाऱ्या करवाढीचा जाहीर विरोध केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना व भाजपाच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात हिरवा कंदील दिल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले.
भाजपा मिशन २०१७पालिका नगरसेवक पदाच्या आगामी निवडणूका २०१७ मध्ये होणार आहेत. या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करून भाजपा पक्षाअंर्तगत निर्णय वांरवार भूमिका बदलत आहे. कालपर्यंत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर लावण्यास समंती देणाऱ्या भाजपाने आज या प्रस्तावाला विरोध करीत मालमत्ता करातून वगळल्याचा टेंभा मिरवत आहे. मध्यमवर्गीय मुंबईकरांचा मतदारवर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपाने ही रणनिती असल्याचे बोलले जात आहे