मुंबई : सरकारने यापुढे आमचा अंत न पाहता धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) सवलती लागू कराव्यात, अन्यथा आम्हाला सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी दिला.
आश्वासनाचे गाजर दाखवून भाजपाकडून एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस धनगर समाजाला आरक्षण देऊ असे म्हणत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या मंत्रिमंडळातील विष्णू सवरा हे धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण मिळणार नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे भाजपाकडून आम्हाला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. आश्वासनाचे गाजर दाखवून भाजपा फसवणूक करीत आहे. त्याच्या निषेधार्थ आणि आमचा हक्क मागण्यांसाठी आम्ही विधानभवनावर मोर्चा काढला. समाजाच्या आरक्षणासाठी यापुढे सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशरा शेंडगे यांनी दिला. ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, आमदार दत्तात्रय भरणे, रामाराव वडकुते, रक्षणा सलगार आदींची या वेळी भाषणे झाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी मोर्चास भेट देऊन पाठिंबा दर्शवला.
मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आडवा जाईन - धनंजय मुंडे
आरक्षण ही गेल्या अनेक वर्षांपासूनची धनगर समाजाची लढाई आहे. समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी लढाई होईल त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरायला आणि लाठय़ाकाठय़ा खायला मी पुढे राहीन. धनगर समाज कोणाकडे भीक मागत नसून आपला हक्क मागत आहे. नजीकच्या काळात आणखी तीव्र संघर्ष करावा लागणार असून मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आडवा जाईन, पण समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दिला.