मुंबई: २३ मार्च - पनवेलमधील चर्चवरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी रविवारी नागपुरात दिलेली माहिती आणि स्थानिक पोलीसांची माहिती यात विसंगती असून त्यामुळे अल्पसंख्यकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी त्यांनी आज विधानसभेत केली.
अल्पसंख्यकांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना, त्यातही विशेषत: पनवेलमधील चर्चवर झालेली दगडफेक ही अतिशय गंभीर घटना असून त्यामुळे अल्पसंख्यकांच्या मनात भीती निर्माण झाली असल्याचा मुद्दा आज विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. आपल्या प्रस्तावावर बोलताना ते म्हणाले की,कोणत्याही परिस्थितीत अल्पसंख्यकांचे संरक्षण करू असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री करतात, मात्र त्यांच्याच पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात अल्पसंख्यकांवर हल्ले होतात. हे पुराेगामी अशा राज्याला निश्चितच भुषणावह नाही. त्यामुळे राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने निवेदन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावर महसुल मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात सरकारची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले पनवेलमधील एका चर्चवर झालेली दगडफेक ही अतिशय गंभीर बाब असून त्यामागे राजकीय शक्तीचा हात असल्याचा आपल्याला संशय अाहे. या घटनेची चौकशी सुरू असून अधिवेशन संपण्यापुर्वी त्याबाबतची संपुर्ण माहिती सभागृहाला दिली जाईल.