नवी दिल्ली- पंतप्रधान मोदी सरकारने एका वर्षाच्या कार्यकाळात विदेश दौ-यांसाठी तब्बल ३१७ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. संपुआ-२ सरकारने गेल्या वर्षी विदेश दौ-यांसाठी २५८ कोटी रुपये खर्च केले होते. मोदी सरकारने संपुआ सरकारपेक्षा ५९ कोटी रुपये अधिक खर्च केले आहेत.
यामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री आणि माजी पंतप्रधान यांच्या दौ-यांच्या खर्चाचा समावेश आहे. तसेच पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी वापरण्यात येणा-या विशेष विमानांच्या देखभालीसाठी करण्यात येणारा खर्चही परदेशी दौ-यांच्या खर्चात समाविष्ट करण्यात येतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ६५ मंत्र्यांच्या वेतन आणि भत्त्यासाठी या वर्षात १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले तर पीएमओचा २०१४-१५ मधील खर्चाची रक्कम ४० कोटी इतकी आहे. गेल्या वर्षी संपुआ सरकारने ३१ कोटी रुपये खर्च केले होते. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या कार्यकालात संपुआ २ सरकारच्या कार्यकाळात परदेश दौ-यांसाठी एक हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च झाला.