शिवसेनेला चाप लावण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी अजोय मेहता यांची नियुक्ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेला चाप लावण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी अजोय मेहता यांची नियुक्ती

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईच्या विकास आराखड्यावरून टिका झालेले आयुक्त सिताराम कुंटे यांची अखेर पदावरून उचलबांगडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्राईल दौऱ्यावर रवाना होता होता महापालिका आयुक्‍त सीताराम कुंटे यांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यांच्या जागी केंदीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासमखास असलेल्या अजोय मेहता यांची वर्णी लावली आहे. अजोय मेहता यांची नुकतीच पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव या पदावर बदली झाली होती. त्याआधी मेहता हे सतत ६ वर्षे महापारेषण या शासकीय वीज कंपनीचे महासंचालक होते. 

मुंबईचा सन २०१४ ते २०३४ या २० वर्षाचा विकास आराखडा बनवण्यात आला आहे. हा आराखडा मुंबईकर नागरिकांसाठी नसून बिल्डरांसाठी असल्याची टिका झाली होती. विकास आराखड्यात असंख्य चुका असल्याने आराखड्याविरोधात ५० हजार सूचना व हरकती आल्या आहेत. विकास आराखड्या विरोधात मिडीयाने झोड उठवताच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेही आराखडा चुकीचा असल्याचे मत नोंदवले होते. यानंतर आयुक्त सिताराम कुंटे यांची त्वरित उचलबांगडी होईल अशी चर्चा होती. 

पालिका आयुक्तांचा ३ वर्षाचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत असताना नवे आयुक्त येतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यावर जाता जाता कुंटे यांची बदली करत त्यांच्या जागी मेहता यांची नियुक्ती केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदासाठी गृहनिर्माण विभागाचे सहसचिव सतीश गवई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्र्यांकडे झाल्याचे वृत्त आहे. मात्र, चटर्जी पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत. तर करीर आणि गवई यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या असल्याचे कारण पुढे करण्यात आल्याचे समजते. 



नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मुंबईमधून गुजराती व हिंदी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात मते दिल्याने भाजपाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आले आहे. यामुळे भाजपालाही मराठी अधिकारी पालिकेचा आयुक्त म्हणून नको होता. नुकत्याच झालेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगर पालिकेचे निकाल पाहता भाजपाला २०१७ ची पालिका एकट्याने लढवून एक हाती सत्ता मिळवायची आहे. शिवसेनेला मुंबईमध्ये रोखायचे असेल तर येणाऱ्या काळात शिवसेना सत्ताधारी पक्ष म्हणून जे निर्णय घेईल त्याला विरोध करणारा आणि शिवसेनेला चाप लावत भाजपाला लाभ करून देणारा अधिकारी आयुक्त म्हणून भाजपाला हवा होता. मेहता हे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचे खासमखास अधिकारी असल्याने भाजपाच्या इच्छेनुसार काम करून मेहता यांच्यावर शिवसेनेला रोखण्याची जबादारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages