रुळांलगतच्या झोपड्यांना आवरा - पश्‍चिम रेल्वेची पालिकेला विनंती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रुळांलगतच्या झोपड्यांना आवरा - पश्‍चिम रेल्वेची पालिकेला विनंती

Share This
मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टीला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीमुळे रेल्वे रुळांलगतच्या झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आगीच्या घटनेनंतर रेल्वे रुळांना खेटून झोपड्या उभ्या करण्याचे प्रकार रोखा, असे साकडे मुंबई महापालिका प्रशासनाला घालण्याची वेळ पश्‍चिम रेल्वे प्रशासनावर आली आहे. यासंदर्भात पालिकेला लेखी स्वरुपात विनंती करणार असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.


वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या शेजारी असलेल्या झोपड्यांना शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे पश्‍चिम रेल्वेला 'पीक अवर्स'ला लोकलच्या जवळपास ३0 फेर्‍या रद्द कराव्या लागल्या, तर अनेक धीम्या गाड्या जलदगती मार्गावरून चालवाव्या लागल्या. तसेच ओव्हरहेड वायर्सचा वीजपुरवठाही खंडित करावा लागला होता. या घटनेने रेल्वे रुळांलगतच्या झोपड्यांना आवर घालण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. पालिका प्रशासनाने झोपड्या आणि रेल्वे सीमा यांच्यात 'सेफ्टी बफर झोन' उभारावेत, अशी अपेक्षा पश्‍चिम रेल्वेने प्रकट केली आहे. वांद्रेसारख्या रेल्वे स्थानकांजवळील झोपड्यांवर राजकीय कृपाशीर्वाद असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाने अन्य पर्याय शोधून बेकायदा झोपड्यांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages