मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2015

मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट मिळणार

मुंबई : मुंबईतील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातील प्रस्तावित वाढ करण्यात येऊ नये. त्यामध्ये सूट मिळावी, अशी मागणी मंगळवारी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अँड़ आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी याबाबत तत्त्वत: तयारी दर्शवत मंत्रिमंडळात निर्णय घेऊन आवश्यक असल्यास अधिसूचना काढू, अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिली. 
मुंबई महापालिकेने मालमत्ता कराचे नवे धोरण स्वीकारले असून चालू आर्थिक वर्षापासून सर्वसामान्य मुंबईकर जे पाचशे चौरस फूट व त्यापेक्षा कमी चौरस फुटाच्या घरांमध्ये राहतात, अशांवर सुमारे ४0 टक्के करवाढ होणार आहे. मुंबईत ८ लाख घरे ही पाचशे आणि त्यापेक्षा कमी चौरस फुटांची असून या करवाढीबाबत सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुंबईकरांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधीत या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात भेट घेतली. मुंबई महापालिका आकारत असलेल्या भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीमुळे आगामी पाच वर्षात अशा छोट्या घरांमध्ये राहणार्‍या सर्वसामान्य मुंबईकरांवर अतिरिक्त कराचा बोजा पडू नये म्हणून महापालिका अधिनियम १४0(अ) मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असून सरकारने ही सुधारणा करून सामान्य मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे या शिष्टमंडळाचे म्हणणे होते. दरम्यान, याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे आपण लवकरात लवकर याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेऊ. तसेच आवश्यकता भासल्यास अधिसूचनाही काढली जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मुंबई महापालिकेने मालमत्ता कराचे जे धोरण अवलंबले ते चुकीचे असल्याने मुंबईकरांकडून १२00 कोटी रुपये अतिरिक्त कर जमा करण्यात आला आहे. ही कराची रक्कम मुंबईकरांना परत करण्यात यावी, अशी मागणी आमदार अँड़ आशीष शेलार वारंवार करीत आहेत. याबाबत न्यायालयानेही महापालिकेला निर्देश दिले असून महापालिकेने अँडव्होकेट जनरल यांचे मत मागितले आहे. याकडेही आमदार अँड़ शेलार यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. याबाबतही आपण लक्ष घालू असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS