मुंडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ३ ते ९ जून पर्यावरण सप्ताह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2015

मुंडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ३ ते ९ जून पर्यावरण सप्ताह

मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकासमंत्री या नात्याने व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने देशासाठी व राज्यासाठी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांचे योगदान विचारात घेता त्यांच्या स्मरणार्थ पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ३ ते ९ जून या कालावधीत दरवर्षी पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला असून या वर्षी हा दिन साजरा करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. 
या पर्यावरण सप्ताहामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. वृक्ष लागवड ही प्राथमिक, माध्यमिक शाळेची ठिकाणे, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, समाजमंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनी, शासकीय, निमशासकीय कार्यालये व रस्त्याच्या दुतर्फा इत्यादी ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक यांनी योग्य प्रतीच्या रोपांचा पुरवठा सर्व संबंधितांना करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

गावामध्ये पर्यावरण सप्ताहसर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करावे, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते ३ जून रोजी किमान एका गावामध्ये पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ करावा, असेही निर्देशित करण्यात आले आहे. या पर्यावरण सप्ताहामध्ये सक्रिय लोकसहभाग घेण्यात येणार आहे. वृक्ष लागवड करावयाच्या कार्यक्रमाचे गावनिहाय नियोजन केले जाणार आहे. पर्यावरण सप्ताहाच्या कार्यक्रमाचे संनियंत्रण विभागीय आयुक्त करणार आहेत. राज्यात वृक्ष व फळबाग लागवड, त्याचे संगोपन व संरक्षण या कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो. यानिमित्त ५ ते ९ जूनदरम्यान साजरा होणार्‍या पर्यावरण सप्ताहात राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले राज्य 'हरित राज्य' करण्याच्या तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages