डीसी-एसी विद्युत रूपांतरण अशक्यच ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2015

डीसी-एसी विद्युत रूपांतरण अशक्यच ?

मुंबई : सीएसटी ते कुर्ल्यापर्यंत डीसी-एसी विद्युत रूपांतरणाचा घाट मध्य रेल्वेने घातला असला तरी, ते प्रत्यक्षात साकारणे अशक्य आहे, अशी चर्चा रेल्वेच्याच अधिकार्‍यांमध्ये सुरू आहे. हे काम सुरू झाल्यावर सीएसटी ते कुर्ला दरम्यान नऊ ठिकाणी गाडीचा वेग ताशी १५ किमी. असल्यास त्याचा परिणाम सर्व सेवेवर होईल, अशी भीती अधिकार्‍यांना वाटत आहे आणि कुर्ला ते सीएसटी मार्गावर इंजिनची उंची ४.२७ मीटर्सपेक्षा जास्त असल्यास ते इंजिन या मार्गात प्रवेश करू शकणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेतील विश्‍वसनीय गोटातून देण्यात आली. त्यातच रूपांतरणाच्या कामाचा सुरुवात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते फोडण्याची महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांची इच्छा आहे; पण प्रभू कामात प्रचंड व्यग्र असल्याने ते उपलब्ध होत नसून येत्या रविवारीही प्रभूंना सीएसटीला येण्यास फुरसत नाही, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍याने सांगितले. 
रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सीएसटी ते कुर्ला मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेकडून आणखी अवधी मागितला असून गेल्या दोन रात्री ते रेल्वेच्या अधिकार्‍यांसह विविध ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. अद्यापि त्यांची पाहणी संपलेली नसल्याने सीएसटी ते कुर्ला विद्युत रूपांतरणाच्या कामाची घोषणा करता येणार नाही, असे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी पत्रकारांना सांगितले. रूपांतरणाचे काम मध्यरात्री १२.४0 ते पहाटे साडेचार या वेळेतच करावे लागणार असून या कामाचा रोजच्या लोकल वाहतुकीवर होता कामा नये, याची काळजी घ्यावी लागेल. हे काम सुरू करण्याआधी बर्‍याच तपासण्या कराव्या लागणार आहेत, असे सूद म्हणाले. कुर्ला ते सीएसटी मार्गावर इंजिनची उंची ४.२७ मीटर्सपेक्षा जास्त असल्यास ते इंजिन या मार्गात प्रवेश करू शकणार नाही, याकडे महाव्यवस्थापकांचे लक्ष वेधले असता, 'पश्‍चिम-मध्य रेल्वेतील काही इंजिनांची उंची कमी करावी लागणार असली तरी, येथे धावणार्‍या इंजिनांची उंची पुन्हा मोजणे आवश्यक नाही, असा दावा त्यांनी केला. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील काही जुने रेक सेवेतून बाद करण्यात येणार आहेत. भविष्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यात सीमेन्सचे व पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात फक्त बंबार्डियरचे 'रेक' असणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS