मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या वैधानिक समिती असलेल्या सुधार समिती मध्ये मांडल्या जाणाऱ्या ठरावांच्या सूचनांना पालिका प्रशासन गंभीर घेत नसून ठराविक कालावधीत असे अहवाल देत या सूचनांचे अहवाल त्वरित मिळावेत अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या सुधार समिती मध्ये अनेक ठरावाच्या सुचाना येतात यावर सदस्य चर्चाही करतात, काही सुचाना अभिप्रायासाठी किंवा अहवालासाठी पालिका प्रशासनाकडे पाठवल्या जातात. प्रशासनाने सुधार समितीने सप्टेंबर २०११ पासून पाठवलेल्या २३ ठराव अजून प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवाला बाबत सुधार समितीच्या २३ एप्रिल आणि १८ मे च्या बैठकीत सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढील मासिक सभेमध्ये गेल्या ४ ते ५ वर्षातील प्रलंबित ठरावांचे अहवाल समितीपुढे सादर केल्यास सभा तहकूब करण्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे. सुधार समिती वैधानिक समिती असल्याने प्रलंबित असलेले अहवाल सभेपुढे सदर करणे आवश्यक आहे. ठरावांचे अहवाल ४५ दिवसात समिती पुढे सादर करावेत अशी सदस्यांची अपेक्षा असल्याचे आयुक्तांना पत्र लिहून कळवल्याचे गंगाधरे यांनी सांगितले आहे.

