गृहनिर्माण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची आरटीआय कार्यकर्त्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गृहनिर्माण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची आरटीआय कार्यकर्त्याची मागणी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई मधील उपकरप्राप्त इमारतीमधून म्हाडाला किती अतिरिक्त क्षेत्रफळ, सदनिका, भांडवली मुल्य मिळाले याची सविस्तर माहिती मागवूनही माहिती न देणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्याविरोधात आरटीआय कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांचे उपोषण व धरणे आंदोलन सुरु आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गायकवाड यांनी हवी असलेली माहिती द्यावी असे आदेशही दिले आहेत. परंतू माहिती आयोग आणि गृहनिर्माण मंत्री यांनी दिलेले आदेश म्हाडाचे अधिकारी केराच्या टोपलीत टाकत असल्याने याची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घेवून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप गायकवाड यांनी केली आहे.  

जी उत्तर, एफ दक्षिण, एफ उत्तर या तीन विभागातील किती उपकारप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यात आला, किती इमारतींना पुनर्वसन करण्याची परवानगी म्हाडा कार्यालयाने दिली, त्या इमारतीचे नाव आणि पत्ते व सविस्तर माहिती गायकवाड यांनी १२ ऑक्टोबर २०१२ला माहिती अधिकारातून मागितली होती. परंतू म्हाडामधील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यास नकार दिला होता. या विरोधात गायकवाड यांनी माहिती अधिकारा नुसार अपील दाखल केले होते. सदर प्रकरणात अपील अधिकाऱ्यांनी आदेश देवूनही माहिती देताना पुनर्रचना प्रक्रियेमध्ये म्हाडाला किती सदनिका प्राप्त झाल्या याचा तपशील देण्यात आलेला नव्हता. यामुळे अपिलकर्ते दिलीप गायकवाड यांचे समाधान न झाल्याने त्यांनी माहिती आयोगाकडे अपील दाखल केले असता सविस्तर माहिती एक महिन्यात द्यावी तसेच याबाबत केलेल्या लेख अनुपालन अहवाल १५ सप्टेंबर पर्यंत माहिती आयोगाला सदर करावा असे आदेश बृहन्मुंबई माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळाला दिले होते. 

परंतू कोणतीही योग्य माहिती देण्यात आली नसल्याने दिलीप गायकवाड यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर त्वरित माहिती देण्याचे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले होते. मुख्य माहिती आयुक्तांनी आदेश देवूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने दिलीप गायकवाड यांनी १५ जून पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदुत उपोषण व धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे. या उपोषणाची दखल घेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गायकवाड यांना मंत्रालयात २९ जूनला भेट दिली होती. या भेटी दरम्यान मेहता यांनी ३ दिवसात माहिती देण्याचे आदेश गृहनिर्माण व म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. परंतू गृहनिर्माण मंत्र्यांनी आदेश देवून महिना होत आला तरी म्हाडा व गृहनिर्माण विभागातील अधिकारी माहिती देत नसल्याने यामध्ये घोटाळा झाला असल्याची शक्यता गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश मेहता यांनी दिलेले आदेशही म्हाडाचे अधिकारी पाळत नसतील तर गृहनिर्माण मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार राहत नसल्याने मेहता यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप गायकवाड यांनी केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages