शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अति. आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अति. आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते सत्कार

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) -  शिक्षणाची आवड व मनात जिद्द असेल तर कितीही संकटे आली तरी न डगमगता मनुष्य आपले ध्येय गाठतोच, असेच काहीसे या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही सुशांत गाडे व संचिता खैर या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य स्तरावर मिळविलेले यश हे महापालिका विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अति.आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा आयोजित पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च – २०१५ चा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आला असून या परीक्षेत राज्य स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अति. आयुक्त (शहर) यांच्या दालनात पार पडला, त्यावेळी आयोजित छोटेखानी समारंभात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्या बोलत होत्या.


पूर्व माध्यमिक (इयत्ता ४ थी) च्या शिष्यवृत्ती परीक्षेला महानगरपालिकेचे ५ हजार ६३४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ७८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. माध्यमिक (इयत्ता ७ वी) च्या शिष्यवृत्ती परीक्षेला महानगरपालिकेचे ३ हजार ७९९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ हजार ५४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या राज्य गुणवत्ता यादीतील ११९ विद्यार्थ्यांपैकी प्रभादेवी महापालिका मराठी प्राथमिक शाळा क्र. २ चा विद्यार्थी सुशांत बंडू गाडे हा संपूर्ण राज्यामध्ये चौथा तर संचिता संतोष खैर ही विद्यार्थीनी संपूर्ण राज्यामध्ये सहावी आली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रभादेवी मनपा मराठी प्राथमिक शाळेच्या २१ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आपले नाव झळकवून महानगरपालिकेची शान वाढविली आहे. या विद्यार्थ्यांच्या या परीक्षेच्या तयारीसाठी ४३ सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यासोबतच दरमहा पालकसभा घेऊन अत्याधुनिक `व्हर्च्युअल क्लासरुम` शिक्षण पद्धतीद्वारे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages