मुंबई, दि. 26 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विकास कामांसाठी प्राधिकरणाकडून 60 कोटी 61 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रामुख्याने रस्ते मजबुतीकरण, काँक्रिटीकरण, गटार बांधकामासाठी हा निधी उपलब्ध होणार असल्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. मुंबईलगतच्या जिल्ह्यांसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून भरीव तरतुदीमुळे या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.
पालघर जिल्हा परिषदेमधील अर्नाळा सुभाष लेन ते मुक्कामपाडा रस्ता, अर्नाळा ते शितलवाडी, रानवाडी ते लक्ष्मणरस्ता, अर्नाळा ते बेंडेवाडी ते लक्ष्मणरस्ता, अर्नाळा पाननाका, जांभुळपाडा, बत्तालवाडी ज्योती या रस्त्यांचा सुधार, तसेच अर्बाध किल्ला रोड-चेकनाका ते बच्छावपाडा रस्ता गटारासह काँक्रिटीकरण्यासाठी दोन कोटी 31 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेमधील कल्याण तालुक्यामधील घोटसई संत्याचापाडा मानिवली रस्ता, ग्रामीण मार्ग 45 ते नांदप घोटसई ते प्र-जिल्हा मार्ग 49, ग्रामीण मार्ग 46, राष्ट्रीय महामार्ग 222 ते आणे भिसोळ रस्ता, नाळिंबी ते तालुका सिमेपर्यंत रस्त्यांचा सुधार, दहागाव पाई चौरे रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी आठ कोटी सात लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेतील अंबरनाथ तालुक्यातील मूळगाव अस्नोली रस्ता, बारवीडॅम करंद मोऱ्याचा पाडा रस्ता, राहटोली चोपण पोटगाव रस्ता, बारवीडॅम बोराडपाडा कुडेरान या चार रस्त्यांच्या मजबुती आणि डांबरीकरणासाठी सात कोटी नऊ लाख रूपये देण्यात येणार आहे
कर्जत नगरपरिषदेमधील डेक्कन जिमखाना ते पिंटो गॅसपर्यंतचा रस्ता आणि गटार बांधकाम, मयुरा हॉटेल ते शिवाजी चौक रस्ता आणि गटार बांधकाम, संत रोहिदास नगर येथील डीपी रोड श्री गायकवाड यांच्या घरापासून श्री. दगडे यांच्या घरापर्यंत रस्त्यासाठी सहा कोटी 76 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेमधील पूर्व विभागातील एमआरडीसी रस्ता येथील सुर्यानगर ते आंबेडकर चौकी, किर्ती पोलिस लाईन ते रिंग रोडपर्यंत रस्ता, खरवाई नाका ते उषाकिरण सोसायटी ज्युवेली गावापर्यंत रस्ता, संभाजी चौक ते शिरगाव बिल्डींगपर्यंत रस्ता, पश्चिम विभागातील गॅस गोडावून सुभाषनगर ते एमआडीसी वडवली चौक रस्ता आणि चैतन्य संकुल ते रोशन अपार्टमेंट शिरगाव रस्त्यापर्यंतच्या काँक्रिटीकरणासाठी 13 कोटी 87 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेमधील कर्जत तालुक्यातील बोरलेगाव ते कशेळे नेरळ मुख्यरस्ता, जिते गाव ते बोरले गाव, जिते फाटा ते जिते गाव, रेल्वे सब स्टेशन ते जिते फाटा, नेरळ जकात नाका ते स्टेशन, नेरळ स्टेशन ते खांदा, नेरळ अंबिका चौक ते पाडा, नेरळ महाड बँक ते महेश टॉकीजच्या कामासाठी 22 कोटी 60 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
