मुलांचा शैक्षणिक खर्च महानगरपालिका का उचलत नाही
कालबादेवी येथील गोकुळ निवास या इमारतीला आग लागली होती. या आगीमध्ये मुख्य अग्निशमन दल अधिकारी सुनिल नेसरिकर, अमीन, सहाय्यक अग्निशमन अधिकारी एस. डब्लू. राणे व स्टेशन अधिकारी एम. एन. देसाई हे अधिकारी अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. चार अधिकाऱ्यांचा मृत्यू होताच अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिकेने या अधिकाऱ्यांना शहीद म्हणून घोषित केले. त्यांच्या वारसला नोकरी देवून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. परंतू अद्याप एक वर्षा पूर्वी जुलै 2014 मधे अंधेरी लोटस पार्क या व्यावसायीक इमारतीला लागलेली आग विझवताना मृत्यूमुखी पडलेल्या नितीन येवलेकर या तरुण कर्मचाऱ्याला मात्र अद्याप शहीद घोषित करण्यात आलेले नाही असे शुभांगी येवलेकर यांनी सांगितले.
मृत नितीन येवलेकर यांच्या पत्नीचा सवाल
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई अग्निशमन दलामध्ये आग विझवताना मृत्यूमुखी पडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळा न्याय लावला जात असल्याने अंधेरी लोटस पार्क येथील आग विझवताना आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या नितीन येवलेकर यांना अद्याप शहीदचा दर्जा देण्यास मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नितीन येवलेकर यांच्या पत्नी शुभांगी येवलेकर यांनी केला आहे.
कालबादेवी येथील गोकुळ निवास या इमारतीला आग लागली होती. या आगीमध्ये मुख्य अग्निशमन दल अधिकारी सुनिल नेसरिकर, अमीन, सहाय्यक अग्निशमन अधिकारी एस. डब्लू. राणे व स्टेशन अधिकारी एम. एन. देसाई हे अधिकारी अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. चार अधिकाऱ्यांचा मृत्यू होताच अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिकेने या अधिकाऱ्यांना शहीद म्हणून घोषित केले. त्यांच्या वारसला नोकरी देवून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. परंतू अद्याप एक वर्षा पूर्वी जुलै 2014 मधे अंधेरी लोटस पार्क या व्यावसायीक इमारतीला लागलेली आग विझवताना मृत्यूमुखी पडलेल्या नितीन येवलेकर या तरुण कर्मचाऱ्याला मात्र अद्याप शहीद घोषित करण्यात आलेले नाही असे शुभांगी येवलेकर यांनी सांगितले.
कालबादेवी येथील आग विझवताना सदर इमारत कोसळणार याची शक्यता असताना अग्निशमन दलाचे अधिकारी आत गेले आणि इमारत कोसळून अडकले आणि आगी मध्ये होरपळून मृत्यूमुखी पडले होते, माझे पती नितीन येवलेकर हे तर लोटसपार्क इमारती मध्ये आग विझवण्याचेच काम करत होते. आग विझावतानाच माझ्या पतींचा मृत्यू झाला असताना अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी असा भेदभाव करून मृत अधिकाऱ्यांना शहीद घोषित केले जाते मात्र मृत कर्मचाऱ्यांना मात्र शहीद म्हणून घोषित केले जात नाही हा अग्निशमन दलातील खरोखर आग विझवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याचे शुभांगी येवलेकर यांनी म्हटले आहे. मृत अधिकाऱ्यांना शहिदाचा दर्जा देवून त्यांच्या वारसांना नोकरी दिली जाते त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पालिका उचलत असेल तर मग मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांना महानगरपालिका वाऱ्यावर का सोडत आहे ? असा प्रश्न उपस्थित करून आमच्या मुलांचा खर्चही महापालिकेने उचलावा अशी मागणी शुभांगी येवलेकर यांनी केली आहे.
माझ्या या मागण्यांबाबत मे महिन्यात मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यान निवेदन दिले आहे. याबाबत दोन वेळा महापौरांची भेटही झाली परंतू महापौरांनी कोणतेही सकारात्मक उत्तर दिलेले नाही. उलट माझ्याकडून काही झाले नाही तर आपण उद्धव ठाकरे यांची भेट घ्या तेच काय तो निर्णय घेतील असे उत्तर महापौरांनी दिले आहे. मे महिन्यात दिलेले निवेदनही महापौर कार्यालयातून गहाळ झाले होते. निवेदन गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्यावर माझ्याकडून या निवेदनाची प्रत घेवून झेरोक्स काढण्यात आली असली तरी या निवेदनावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती शुभांगी येवलेकर यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाबाबत मुंबई महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांच्याशी संपर्क साधला असता नितीन येवलेकर यांच्यासारख्या मृत्यूमुखी पडलेल्या अग्निशमन दलातील इतर कर्मचाऱ्यांना शहिदचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पालिकेने उचलावा यासाठी गटनेत्यांच्या, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तसेच सभागृहामध्ये आवाज उचलून न्याय मिळवून देणार असल्याचे आंबेरकर यांनी सांगितले आहे.