भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा पालिकेच्या एन विभागात आणण्याचा घाट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा पालिकेच्या एन विभागात आणण्याचा घाट

Share This
भूमाफियाकडून राजकीय दबावतंत्राचा वापर 
मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयातील इमारत व कारखाने विभागात काम करणारे सहाय्यक अभियंता ए ए आर शेख यांनी अनधिकृत बांधकामाना अभय दिले होते. सर्व पक्षीय नगरसेवकानी याबाबत तक्रार केल्यावर शेख यांची बदली करण्यात आली असली तरी भूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणारयांकडून राजकीय दबाव वापरून शेख यांना पुन्हा एन विभागात आणण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे राजकीय दबावाला बळी न पडता शेख यांची एन विभागात पुन्हा नियुक्ती करू नये असे पत्र एन विभाग प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश आवळे यांनी महापौर स्नेहल आंबेकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहे. 

मुंबई महानगर पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभाग कार्यालयात इमारत व कारखाने या विभागात सहाय्यक अभियंता पदावर असलेल्या ए ए आर शेख यांनी अनधिकृत बांधकामाना अभय दिले होते. शेख यांच्या कार्यकाळात एन विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. दुय्यम अभियंता असलेल्या शेख यांची 8 जून 2012 रोजी एन विभागातच सहाय्यक अभियंता म्हणून पदोन्नती झाली होती. एकाच विभागात सातत्याने अनेक वर्ष राहिलेल्या शेख यांनी आपल्या पदाचा फायदा उचलत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालण्यास सुरुवात केली होती. एन विभागात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याने शेख यांची बदली करण्यासाठी भारती बावधाणे, प्रतीक्षा घुगे, फाल्गुनी दवे, दिपक हांडे, संजय भालेराव, आणि सुरेश आवळे या सर्व पक्षीय नगरसेवकांनी अतिरिक्त पालिका आयुक्त तसेच नगर अभियंता याना पत्र दिले होते. शेख यांच्या विरोधात आलेल्या तक्रारी आणि सहाय्यक अभियंता या पदावर 8 जून 2015 ला शेख याना 3 वर्षे पूर्ण झाल्याने शेख यांची 30 जुलै 2015 ला एन विभागाच्या बाहेर बदली करण्यात आली.

शेख यांच्या विरोधात अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांना सर्व पक्षीय नगरसेवकानी पत्र देवुनही अनधिकृत बांधकामामध्ये सातत्याने वाढ होत गेली होती. नगरसेवकांनी तक्रारी करूनही शेख यांच्यासह अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 20 नुसार 9 सप्टेंबर पर्यंत एन विभागातील 2000 अनधिकृत झोपड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शेख यांची एन विभागातून आताच बदली करण्यात आली असली तरी भूमाफीयांकडून अनधिकृत बांधकामे करण्यासाठी शेख यांना पुन्हा एन विभागात त्याच पदावर आणण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला जात आहे. शेख हे भ्रष्ट व भूमाफियांच्या इशाऱ्यावर नाचणारे अधिकारी असल्याने त्यांची पुन्हा एन विभागात बदली करू नये अशी मागणी प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश आवळे यांनी महापौर आणि पालिका आयुक्त यांना पत्र देवून केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages