बेकायदेशीर कृत्य करणार्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई
|
मुंबई : मालवणी, मढ, आक्सा या ठिकाणी जोडप्यांवर कारवाई करून नामुष्की ओढवून घेणार्या मुंबई पोलिसांनी यापुढे मुंबईकरांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करू नये, असे सूचनावजा आदेश मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पोलीस दलाला दिले आहेत. या प्रकारचे बेकायदेशीररीत्या कृत्य करताना आढळून आलेल्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मालाड, मालवणी येथील मढ, आक्सा या ठिकाणी असलेल्या हॉटेलवजा लॉजवर मालवणी पोलिसांनी कारवाई करून सुमारे ६0 जोडप्यांवर मुंबई पोलीस अँक्ट ११0 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याची झोड अनेकांकडून उठवण्यात आली होती. मात्र, तेथील नागरिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मालवणी पोलिसांच्या या कारवाईमुळे मुंबईकरांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याच्या आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. कारवाई करणार्या संबंधित पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मारिया यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तसेच लवकरात लवकर अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेशात म्हटले होते.
मालवणी प्रकरणामुळे मुंबई पोलिसांवर ओढवलेल्या नामुष्कीमुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलीस दलाला पत्रकाद्वारे मुंबईकरांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करू नये, असे आदेशच जारी केले आहेत. यापुढे पोलिसांनी गस्तीवर असताना नागरिकांना कसे वागावे, कसे कपडे परिधान करावेत, याबाबत सूचना देऊ नयेत. तसेच या प्रकारचे कुठलेही कृत्य पोलिसांनी करू नये जेणेकरून त्यामुळे मुंबई पोलिसांची जनमानसात प्रतिमा डागाळेल. 'पिटा' अंतर्गत कारवाई करताना संबंधित परिमंडळीय पोलीस उपायुक्तांच्या परवानगीशिवाय कारवाई करण्यात येऊ नये. बेकायदेशीर कृत्य करणारे पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या पत्रकात पोलिसांना सूचनावजा आदेश देण्यात आले आहेत.
