मुंबई : रेल्वे पोलिसांकडे असलेल्या अपुर्या संख्याबळामुळे रेल्वेतून प्रवास करणार्या महिलांना पूर्णवेळ सुरक्षा पुरवणे कठीण असल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नुकताच चर्नी रोड येथे तरुणीवर झालेल्या विनयभंग प्रकरणी रेल्वेतून प्रवास करणार्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. यानुसार रेल्वे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन योजना सुरू करत असल्याचे सांगण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सहा टर्मिनस आहेत, तर १३0 पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकावरील एकूण फ्लॅटफॉर्मची संख्या ४६९ इतकी आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी मध्य रेल्वेवरून ४७ लाख १९ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वेवर ३३ लाख ८७ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. या दोन्ही मार्गावरील रेल्वेचे एकूण प्रवाशांची संख्या भारताच्या एकूण रेल्वे प्रवाशांच्या ३५ टक्के प्रवासी फक्त मुंबई व उपनगरातून लोकलमधून प्रवास करतात.
मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वेच्या ४६९ फेर्या होतात. या तुलनेत सुरक्षेच्या दृष्टीने ३८0 पोलीस आणि २00 होमगार्ड गस्त घालत होते. मात्र, चर्नीरोड येथील प्रकरणानंतर आता या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. महिलांच्या डब्यात रात्री ९ नंतर पोलीस शिपायाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी स्टीकर्स लावण्यात येणार असून, महिला डब्यात पोलीस नसल्यास ९८३३३३११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महिला प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास जवळच्या रेल्वे पोलीस ठाण्याच मदत तत्काळ मिळेल. प्लॅटफॉर्मवर येणार्या प्रत्येक लोकलच्या महिला डब्याची पोलीस तपासणी करणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी दिली. सुरक्षेच्या नवीन उपाय योजनांची आयआयटी मुंबईची देखील मदत घेण्याचा विचार सुरू असल्याचे या वेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.
