मुंबई दि. 20 ऑगस्ट
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे नुकसान होणे ही अत्यंत गंभीर बाब असून याची टास्क फोर्स नियुक्त करून चौकशी करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना दिले आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या पत्रावर हे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबईत जकात चुकवून अनेक वाहने येत असल्याबाबतच्या बातम्या गेले काही दिवस वर्तमानपत्रांमध्ये येत असून त्याची दखल घेत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी या गंभीर मुद्द्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याची मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ दखल घेऊन यावर चौकशीचे निर्देश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत हा जकात असून जकात चोरीमुळे महापालिकेचे कोट्यावधीचे नुकसान होत असल्याचा अंदाज व्याक्त करण्यात येत आहे. काही व्यापारी हे अनधिकृत एजंय, माल वाहतूकदार व जकात कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचे या बातम्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. देय असणाऱ्या जकातीच्या अत्यंत कमी जाकात भरून अवैध्यरित्या गाड्या मुंबईत आणल्या जात असल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले आहे तसेच यामध्ये काही गुन्हेगारी टोळींचा सहभाग असून काही राजकीय नेत्यांचा पाठींबा असल्याचा संशय या बातम्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून मुंबई महापालिकेच्या प्रशासनाकडून याबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नाही. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतही गंभीर असून जकात चुकवणाऱ्या गाड्या दक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निगराणीत शहरात आणल्या जात असल्याचाही संशय घेतला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर यामध्ये संघटित कोळी व काही राजकीय पक्ष यांचे संगनमत आहे की काय, असा संशय घेतला जात असून याची एसआयटी मार्फत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली होती. त्यावर मुंबई पोलिस आयुक्तांना निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ही बाब अत्यंत गंभीर असून महापालिका आपला महसूल गमावत असल्याने याप्रकरणाची स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून चौकशी करण्यात यावी. त्यामुळे आता जकात चोरीची पोलिसांमार्फत चौकशी होणार हे आता निश्चित झाले आहे.
